मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामाध्यमातून नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर २५ हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारीत केले आहे.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत या शिबिरांचे आयोजन होत आहे. या सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शासनाचे विविध विभाग, विविध गैरसरकारी संस्था व लोकसहभागातून ही शिबिरे आयोजित होत आहेत. शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आरांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशन पुढे आले आहे. विविध जिल्ह्यात मणक्याशी संबंधित निदान झालेल्या रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यात जावून रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त व मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज यांनी सांगितले.
या शस्त्रक्रियांना प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये निदान झालेल्या ६ रुग्णांवर स्पाईन शस्त्रक्रिया डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रिया या महागड्या असून त्याचा खर्च ३ ते ५ लाख रुपये एवढा असतो. हा खर्च सर्वसामान्य गोर-गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना या शस्त्रक्रिया करता येत नाहीत. सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याने गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
स्पाईन फाऊंडेशनाच्या माध्यमातून शिबिराशी संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार असून मणक्यांच्या आजाराबाबत संशोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ शेखर भोजराज यांनी दिली. डॉ. भोजराज हे मुंबईतील मणक्याच्या आजारावरील विशेषज्ज्ञ असून त्यांनी स्पाईनच्या दुर्मिळ अशा हजारो सर्जरी केल्या आहेत. त्यांनी जळगाव येथे आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेटी दिल्या व तेथील उपस्थित रुग्ण व डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
१५०० रुग्णालयांबरोबर विविध विभागांचा सहभाग
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षामार्फत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे १५०० रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये, धर्मादाय संस्था, मेडिकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व लोक सहभागातून हे आरोग्य शिबिरे पार पडणार आहेत. उप मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक हे सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य समन्वयक आहेत.
५९ प्रकारच्या तपासण्या होणार
शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसोबतच ५९ प्रकारच्या रक्त चाचण्या, ई.सी.जी. या सारख्या तपासण्याही केल्या जाणार असून आवश्यक औषधांचे वाटप केले जाणार आहे. त्यासोबतच आयुष्मान भारत योजना- आभा कार्डचे वाटप केले जाणार आहे. रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. यासाठी उप मुख्यमंत्री कार्यालयांतर्गत ‘राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष समन्वय साधणार आहे.