मुंबई :
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या सुधारीत शैक्षणिक वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षणांतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष लॅटरल एन्ट्री प्रवेशाची अंतिम मुदत एक महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पदवी अभियांत्रिकी, पदव्युत्तर अभियांत्रिकी आणि अन्य तंत्रशिक्षणांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांना संस्थात्मक स्तरावर प्रवेश घेण्यास एक महिन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. या निर्णयामुळे अद्यापपर्यंत प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली आहे.
तंत्रशिक्षणाच्या व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या तसेच संस्थास्तरावरील जागांवर प्रवेश करण्यासाठी मुदत वाढ देण्यासंदर्भात महाविद्यालये, पालक व विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संस्थात्मक स्तरावर होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर करत सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकीच प्रवेशाची अंतिम मुदत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याच्या सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत. या निर्णयामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबरोबरच तंत्रशिक्षण विभागातंर्गत येणाऱ्या अन्य अभ्यासक्रमांची संस्थात्मक फेरी ही २३ ऑक्टोबरपर्यंत चालविण्यात येणार आहे. यामुळे अद्यापपर्यंत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
वास्तूशास्त्र अभ्यासक्रमालाही मुदतवाढ
वास्तूशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेल्या तसेव संस्थास्तरावरील जागांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश करण्यास वास्तूकला परिषदेने परवानगी दिली आहे.