शहर

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिर्डी :

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री-महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडकी बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८‌ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.

महिलांना एसटी बसमध्ये पन्नास टक्के तिकिट सवलत देण्यात आली‌. यामुळे तोट्यात आलेली एसटी फायद्यात आली. शासन महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलपणे काम करित आहे. मुलींच्या शिक्षणासाठी ५०६ महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुलींना शिकविले पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या लाडक्या बहीणींना योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे. यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील‌. या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भगिनींना आश्वस्त केले.

राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे नमूद करून ते म्हणाले, शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून ८ हजार कोटींचा विमा देण्यात आला आहे. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पन्नास वर्षापासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे. पश्चिम वाहिनींचे ५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे काम शासन करणार आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी सांगितले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, शिर्डीतील विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटनाने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख बहींणींनी मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले‌‌ आहेत. यातील अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मुलींचे शिक्षण मोफत करण्यात आले‌. शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्यात आले.‌ शिर्डी संस्थानामधील ५८४ कर्मचाऱ्यांना शासकीयसेवेत कायम करण्यात आले‌. उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील ‘विकासयात्रा’ या पुस्तिकेचे उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या १५ लाभार्थी महिलांना, लखपती दीदी योजनेच्या ४ महिलांना, मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत २ लाभार्थ्यांना, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेंतर्गत डेअरी फार्मसाठी कर्ज वितरण, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर वितरण आदी लाभांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *