शहर

गोमातेला राज्यमातेचा दर्जा देऊन एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवली – जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंदा

भाईंदर : 

देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले अनेक मुख्यमंत्री होऊन गेले मात्र कोणीही गायीला मातेचा दर्जा दिला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शासन निर्णय जारी करत गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. ज्यासाठी ७८ वर्ष वाट पहावी लागली, ती गोष्ट करण्याची हिंमत एकनाथ शिंदे यांनी आज दाखवली. या देशात ५६ इंचाची छाती एकाच व्यक्तीची आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे, अशा शब्दांत जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मीरा भाईंदर येथे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनात ते बोलत होते.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमच्या देशात गोमातेला राज्यमातेचा दर्जा आहे. सीएम अर्थात काऊज मॅन असे सांगत शंकराचार्य यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभाशिर्वाद दिले. काही महिन्यांपूर्वी मुंबईत आपण राजकारणात विश्वासघाताला स्थान नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरी बाजू मांडली. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील कोट्यवधी लोक गायीला मातेच्या स्वरुपात बघु इच्छितात अशी इच्छा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंड़ळात चर्चा करुन गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. गोत्र म्हणजे जे गायीचे रक्षण करतात तेच खरे हिंदू आहेत, असे त्यांनी निक्षून सांगितले.

आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत. आम्ही भारतीय संस्कृतीचे, सनातन धर्माचे आणि भारतीय लोकांचे प्रतिनिधी आहोत, असे शंकराचार्य म्हणाले. त्यामुळे भारताची भावना सडेतोड मांडणे आणि जो भारताच्या संबधी कार्य करेल त्याचे कौतुक करणे हा आमचा अधिकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या देशात गायीविषयी बोलणे हा मोठा अपराध झाला आहे. आपण इस्लामाबाद किंवा कराचीत तर नाही ना, असा विचार मनात येतो. मात्र या कठिण काळात एकनाथ शिंदे यांनी ५६ इंचाची छाती दाखवत गायीला गोमातेचा दर्जा दिला. हा निर्णय भारताच्या परिवर्तनाची सुरुवात असून त्याचे प्रणेते एकनाथ शिंदे आहेत, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *