आरोग्य

ईएसआयसीचा एक वर्षाचा औषध खरेदीचा घाट कोणासाठी?

मुंबई :

राज्यातील कामगार वर्गाला आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्य कर्मचारीविमा महामंडळामार्फत (ईएसआयसी) सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांमधील औषध खरेदीची प्रक्रिया बदलण्याचा घाट महामंडळाकडून घालण्यात आला आहे. ईएसआयसीच्या रुग्णालयांमध्ये दर तीन महिन्यांनी निश्चित केलेल्या दर करारानुसार औषध खरेदी केली जात असताना दर कराराची मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये औषध खरेदीची प्रक्रिया बदलण्यात आली आहे. तीन महिन्यांवरून थेट वर्षाची खरेदी जुन्या दर करारानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांच्या पैशाची महामंडळाकडून उधळपट्टी सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात राज्य कर्मचारी विमा महामंडळांतर्गत वरळी, कांदिवली, मुलुंड, महात्मा गांधी स्मारक, ठाणे, वाशी, उल्हासनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर येथे रुग्णालये चालविण्यात येतात. या रुग्णालयांमध्ये ४५ लाख ५५ हजार इतके नोंदणीकृत विमाधारक कामगार असून, त्यातील २० ते २५ लाख विमाधारक कामगार या रुग्णालयांचा लाभ घेतात. या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या औषधांची खरेदी राज्य कामगार विमा सोसायटीमार्फत करण्यात येते. ही खरेदी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दर करारानुसार दर तीन महिन्यांनी केली जाते. ही खरेदी करण्यासाठी सर्व रुग्णालयांकडून औषधांची मागणी मागविण्यात येते. औषध खरेदी करण्यात येणाऱ्या दर कराराची मुदत ही सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणाऱ्या असल्याने नवीन दर करार निश्चित होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य कामगार विमा सोसायटीने यापूर्वीच रुग्णालयांकडून ऑक्टोबरपर्यंतच्या औषधांची मागणी मागवली होती. मात्र २३ सप्टेंबर रोजी अचानक नवीन अध्यादेश काढत सोसायटीने ऑक्टोबरसाठी करण्यात येणारी औषधांची खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच जुन्या दर करारानुसार पुढील संपूर्ण वर्षभरासाठीची औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व रुग्णालयांकडून वर्षभरासाठी लागणाऱ्या औषधांची मागणी मागवण्यात आली आहे.

नवीन दर करार महिनाभरामध्ये केंद्र सरकारकडून लागू होणार असताना आणि जुन्या दर करारातील अनेक औषधांच्या किमतीमध्ये घट झाली असताना सोसायटीकडून अचानक जुन्या दर करारानुसार थेट वर्षभरासाठी औषध खरेदी करण्याचा घेतलेल्या निर्णयाबाबत औषध वितरकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. हा निर्णय रुग्णांच्या फायद्यासाठी नव्हे तर एका विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी घेण्यात आल्याची चर्चा औषध वितरकांमध्ये रंगली आहे.

७५ औषधांची विशेष यादीही तयार

वर्षभरातील औषधांच्या खरेदीची मागणी रुग्णालयांकडे करण्याबरोबरच सोसायटीने सर्व रुग्णालयांना ७५ औषधांची यादी पाठवली असून, या यादीमधील औषधांचीच सर्वाधिक मागणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *