कोलंबो :
जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत तीस वर्षांवरील महिला गटात यजमान श्रीलंका संघाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला.
भारताच्या तीस वर्षांवरील महिला संघाने दमदार कामगिरी करताना तगड्या श्रीलंके विरुध्द जोरदार कामगिरीचे प्रदर्शन केले. या सामन्यात श्रीलंकेने भारतीय महिलांचा ७५-६५ असा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या अरीत्री मित्राने व कस्तुरी कोलते (२० धावा व २ विकेट) व कस्तुरी कोलते (वजा १४ धावा व १ विकेट) या पहिल्या जोडीने पहिल्या चार षटकांत ३४ धावा जमवल्या, त्यानंतर आलेल्या दुसऱ्या जोडीतील कर्णधार दिशा पटेल (४ धावा व १ विकेट) व रश्मा शेट्टी (८ धावा) यांनी १२ धावांची भर घातली व त्यानंतर आलेल्या तिसऱ्या जोडीतील पूजा जैन (७ धावा व १ विकेट) व विशलक्षि प्रकाश ( ४ धावा) यांनी ११ धावांची भर घालून भारताचा धावफलक हलता ठेवला. तर चौथ्या व शेवटच्या जोडीतल्या उपकर्णधार सुरभी शर्मा (८ धावा व १ विकेट) व ज्योथी चंद्रशेकर (१ विकेट) यांनी ८ धावांची भर घालून भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
या नंतर आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्या जोडीने (मेथ्मा हेत्तीअराच्ची (कर्णधार) व उपकर्णधार उदारा बंदारा) ३० धावा तर दुसऱ्या जोडीने (शशिकाल डीसिल्वा व शानिका विजेसेकरा) २० धावांची भर घातली. तिसऱ्या जोडीला (हर्शानी फर्नान्डो व अनुशिका अंथोनी) १४ धावत रोखण्यात भारत यशस्वी झाला. भारताला आता चौथ्या जोडीला लवकर गुंडाळून जास्तीत जास्त बळी मिळवण्याचे आव्हान होते. मात्र चौथ्या व शेवटच्या जोडीने (नदीका प्रेमासिरी व कुमुदू जयासुन्दरा) यांनी कडवी लढत दिली व ११ धावा मिळवत भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवत विजय साजरा केला. आज झालेल्या इतर सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.