शहर

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून बँकांनी सेवा शुल्क कापल्यास होणार कारवाई

मुंबई :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे.या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही.याबाबत अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या मदतीने २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना दिल्या.

नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचे आधार क्रमांक, अकाउंट नंबर दिले गेले त्यामुळे पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रांवर हे अर्ज भरलेगेले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही यावेळी मंत्री  तटकरे यांनी दिले.

आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी झाली असून १ कोटी ८७ लाख पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी तातडीने करून घ्यावी, अशा सूचनाही मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *