मुंबई :
महात्मा ज्योतिबा फुले जन आराेग्य योजनेची (एमजेपीजेएवाय) देयके आठ ते नऊ महिने प्रलंबित ठेवणे, यातील उपकरणे विनानिविदा व अन्य साहित्य चढ्या दराने खरेदी करणे, आर्थिक अनियमितता आणि नायर रुग्णालयाची बदनामी करणे अशा विविध कारणांअतर्गत नायर रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका जांभोरे यांचे प्रशासनाकडून निलंबन करत त्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले.
एमजेपीजेएवायची अंतर्गत हृदयशल्यचिकित्सा विभाग, हृदयशास्त्र विभाग आणि अस्थिव्यंग विभागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात देयके वर्षभरापासून प्रलंबित ठेवण्यात आली होती. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार ही देयके मंजूर करण्याबाबत सूचना देऊनही त्याकडे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका जांभोरे यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. या देयकांची तपासणी केली असता ही देयके क्षुल्लक कारणांसाठी प्रलंबित ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच एमजेपीजेएवाय अंतर्गत विनानिविदा व चढ्या दराने वैद्यकीय साहित्य व उपकरणे खरेदी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे आढळल्याने नायर रुग्णालयाचे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी डॉ. सारिका यांचे निलंबन करत त्यांना कार्यमुक्त केले.
रुग्णालयात करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, एमजेपीजेएवायचे समन्वयक आणि काही विभाग प्रमुख यांच्याविरोधात तत्कालिन अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी लाचलुचत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक आणि मुंबई युनिटचे अप्पर आयुक्त यांचेकडे तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणाच्या मागील सात वर्षाच्या नस्ती पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आराेग्य योजनेची (एमजेपीजेएवाय) देयके आठ ते नऊ महिने प्रलंबित ठेवल्याने वितरक हे वारंवार रुग्णालयामध्ये आपल्या देयकांसाठी येऊन विचारणा करत असे. मात्र त्यांना सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर दिले जात नसे. त्यामुळे ते सर्वजण अधिष्ठाता यांच्या कार्यालयाकडे येत असे. अधिष्ठाता यांच्या कार्यालयाबाहेर वितरक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने अधिष्ठाता यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होत असे. याबाबत डॉ. सारिका यांना वारंवार देयके काढण्याबाबत सूचना देऊनही त्या दुर्लक्ष करत असे. त्याचप्रमाणे उपकरणे विनानिविदा व अन्य साहित्य चढ्या दराने खरेदी करणे, आर्थिक अनियमितता आणि नायर रुग्णालयाची बदनामी करणे अशा विविध कारणांअतर्गत नायर रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका जांभोरे यांचे प्रशासनाकडून निलंबन करत त्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले.