मुंबई :
माहुलगावात कायमस्वरुपी प्रसूतिगृह व दवाखाना सुरु करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी इमारत बांधण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया निविदाव्दारे सुरु करण्यात आली आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी याबाबत मुंबई महापालिका तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासमोर वारंवार हा प्रश्न उपस्थित करुन माहुलमध्ये रुग्णालय तसेच स्वच्छतेबाबत कार्यवाही करण्यास सांगितले होते. जिल्हा नियोजन समितिच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मंत्री मंगल प्रभात लोढा यांना याबाबत जाब विचारण्यात आला होता. मुलुंड ते घाटकोपरदरम्यान राहणाऱ्या अनेक नागरिकांचे पुनर्वसन माहुलमध्ये करण्यात आले आहे. त्या नागरिकांनी याबाबत खासदार संजय दिना पाटील यांना भेटून आपली व्यथा मांडली होती.
गोवंडी, चेंबुर, आरसीएफ या भागात प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. क्षयरोग, अस्थमा, कर्करोग, चर्मरोग, केसगळती यांसारख्या आजाराने अनेकांना ग्रासले आहे. अनेकांना आपले जीव गमवावा लागला आहे. त्यातच पाण्याची समस्या, घाणीचे साम्राज्य त्यामुळे माहुलकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय उपचार करण्यासाठी एकही सुसज्ज असे रुग्णालय या भागात नसल्याने माहुल गांव, वाशीनाका, आरसीएफ या भागात राहणाऱ्या नागरिकांना राजावाडी किंवा सायन, केईएम रुग्णालयात जावे लागत आहे. माहुल गावात राहणारे बहुतांस नागरिक हे ईशान्य मुंबईतील आहेत. पाईप लाईन किंवा रस्ता रुंदीकरणात आलेल्या लोकांचे माहुल गावात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी काहीच नागरी सेवा-सुविधा नसल्याने अनेकांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत खासदार संजय पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच बरोबर मुलुंड ते मानर्खुद भागातील पालिका अधिका-यांबरोबर झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिकांनी तसेच खासदार संजय दिना पाटील यांनी हे प्रश्न उपस्थित करुन यापुढे ईशान्य मुंबईतील नागरिकांचे पुनर्वसन माहुलगावात न करता आहे त्याच ठिकाणी करण्यात यावे, असा सल्ला दिला होता. त्याचबरोबर मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ही त्यांनी माहुलकरांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला होता. शिवाय नागरिकांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे सुचित केले होते. त्याबाबत पालिका अधिका-यांनी कार्यवाहीला सुरुवात करीत कायमस्वरुपी प्रसूतिगृह व रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.