मुंबई :
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान होता. मराठीला अभिजात दर्जा मिळावा हे बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पूर्ण केले या निमित्त शिवसैनिकांनी आज शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून एकच जल्लोष केला.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पदावर आल्यापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. केंद्र सरकारकडे आवश्यक दस्तावेज पुरवून पाठपुरावा केला होता. परिणामी ३ ऑक्टोबर हा ऐतिहासिक दिवस उजाडला आणि केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन सन्मानित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह कोट्यवधी मराठी भाषिकांचे स्वप्न साकार केले असल्याचे यावेळी खासदार मिलिंद देवरा यांनी सांगितले. या ऐतिहासिक घटने निमित्त शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. बाळासाहेबांचे स्वाभिमानी विचार शिवसैनिकांना सदैव प्रेरणा देत राहतील, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, माजी आमदार, शिवसेना सचिव किरण पावसकर, माजी आमदार, शिवसेना सचिव मनीषा कायंदे , सह मुख्य प्रवक्ता डॉ. राजू वाघमारे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.