चेंबूर :
नवरात्रीनिमित्त घरामध्ये घट स्थापन केला होता. मात्र घटासमोर लावलेला दिवा मध्यरात्री उंदराने पाडल्याने संपूर्ण घराला आग लागली. आग विझविण्यासाठी पाणी टाकले असताना आग अधिकच भडकली. त्यामुळे घरामध्ये सर्वत्र धुर होऊन आग व धुराच्या लोळांनी घरातील सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहणारे छेदी भैय्या नावाने प्रसिद्ध असलेल्या गुप्ता यांची दुमजली झोपडी होती. यातील तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान चालावयचे येथेच प्रेम गुप्ता व त्यांचे कुटुंब राहत होते. गुप्ता कुटुंबीय मागील ५० वर्षापासून किराणा मालाचे दुकान चालवीत होते. यात अनेक घरगुती किराणापासून स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ज्वलनशील अशा रॉकेलचा ही समावेश होता.
नवरात्रीनिमित्त त्यांच्या तळमजल्यावरील किराणा दुकानात घट स्थापन करण्यात आली होती. शनिवारी रात्री पूजा करून गुप्ता कुटुंब झोपी गेले. मात्र सकाळी ५ वाजताच्या सुमारास घटामधील दिवा उंदराने खाली पाडला. हा दिवा किराणा दुकानामधील रॉकेलच्या साठ्यावर पडला आणि मोठी आग लागली. प्रेम गुप्ता यांनी आग विझविण्यासाठी त्यावर पाणी टाकले. मात्र रॉकेलवर पाणी टाकल्याने ते सर्व तळमजल्यावर पसरून आग भडकत गेली. आगीचा भडका झाल्याने पहिल्या मजल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रचंड धुर झाला यात गुप्ता याचे कुटुंब गुदरमरून गेले स्थानिक तरुणांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. मुंबई पोलीस आणि अग्निशमन विभागाला पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र आग व धुराच्या लोळांनी या कुटुंबातील चार लोकांचा बळी घेतला. तर तीनजण गंभीर भाजल्यामुळे त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी आणी स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या भीषण आगीत इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेल्या दुकानातील इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आदी साहित्य जळून खाक झाले.
मृतांची नावे
प्रेम छेदीराम गुप्ता (३०), मंजू प्रेम गुप्ता (३०), अनिता धर्मादेव गुप्ता (३९), नरेंद्र गुप्ता (१०) आणि मुलगी परी गुप्ता (७), विधी छेदीराम गुप्ता (१५) आणि गीतादेवी धर्मादेवी गुप्ता (६०) यांचा समावेश आहे.
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे, ‘शिवसेना आमदार प्रकाश फातरपेकर, स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी भेट देऊन दुर्घटनेबाबत अग्निशमन दल व मुंबई पोलीस अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.