मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र (हिवाळी २०२४) होणाऱ्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २३ ऑक्टोबर २०२४ पासून या परीक्षेला सुरुवात होत आहे. ५६ हजार १४० एवढे विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होणार असून, ज्या महाविद्यालयांनी परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे अशा ४५ हजार १०० विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटे महाविद्यालयीन लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे हॉल तिकिटही महाविद्यालयीन लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत.
हिवाळी सत्र २०२४ साठी आयोजित होणाऱ्या या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र ५ च्या परीक्षा या २३ ऑक्टोबर २०२४ पासून आयोजित केल्या जाणार आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार आहेत. एलएलबी ( ३ वर्षीय) सत्र ५ आणि एलएलबी ( ५ वर्षीय) सत्र ९ ची परीक्षा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी ( संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून आयोजित केल्या जातील. यासह पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इंजिनीअरींग, आर्कीटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकाचे अवलोकन करण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची कार्यवाही महाविद्यालयांमार्फत करण्यात यावी असेही आवाहनही त्यांनी केले आहे.