छत्रपती संभाजीनगर :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
लाडकी बहिण योजनेचे पंतप्रधानांकडून कौतुक
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी लाडकी बहीण योजना उपयुक्त – देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाला विकासाकडे नेण्यासाठी महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. त्यानुसार महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उपयुक्त ठरत आहे. केंद्र शासनाने महिलांसाठी बेटी बचाओ, बेटी पढाओपासून ते लखपती दीदी सारख्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनामार्फत लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर टप्प्या-टप्प्याने एक लाख रुपये जमा केले जात आहेत. महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. ही योजना बंद होणार असलाचा अपप्रचार काही लोकांकडून केला जात आहे, मात्र यापुढेही ही योजना अशीच सुरु राहील, असा विश्वास फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असल्याने सर्व बाबींचा विचार करूनच ही योजना जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही. या योजनेच्या सुरुवातीला रक्षाबंधनापूर्वीच बहिणींच्या खात्यावर ओवाळणीची रक्कम जमा करण्यात आली होती. आता दिवाळीपूर्वीच म्हणजेच याच आठवड्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या रक्कमेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होईल, असे पवार म्हणाले.
राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाच महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात यश आले आहे. २ कोटी २२ लाख महिलांपर्यंत हा लाभ पोचला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभही लवकरच जमा होईल. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात १० हजार रिक्षा देण्यात येत आहेत. महानगर क्षेत्रात ५०० ते १ हजार रिक्षा देण्यात येत आहेत. पुढे हेच उदिष्ट २ हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.