मुंबई :
माहुल परिसरातील प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामळे येथील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या परिसरात प्रसूतिगृह व दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसूतीगृह व दवाखान्यासाठी इमारत बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दवाखाना व प्रसूतीगृहाच्या उभारणीसाठी साधारणपणे ३८ कोटी ४७ लाख ५० हजार ३३१ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
माहुल परिसरात असलेले रासायनिक कारखाने, तेल शुद्धीकरण कंपन्या यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. या प्रदूषणामुळे माहूल गाव, वाशीनाका, आरसीएफ या भागागतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. क्षयरोग, अस्थमा, कर्करोग, त्वचारोग, केसगळती यांसारख्या आजाराने येथील नागरिकांना ग्रासले आहे. अनेकांना विविध आजारांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच या परिसरातील पाण्याची समस्या, घाणीचे साम्राज्य यामुळे माहुलवासीय जीव मुठीत घेऊन जगत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले प्रदूषण आणि त्यांने आजाराने त्रासलेले नागरिक अशी अवस्था असताना या रुग्णालयामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी एकही सुसज्ज असे रुग्णालय नाही. त्यामुळे माहुल गांव, वाशीनाका, आरसीएफ या भागात राहणाऱ्या नागरिकांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, शीव रुग्णालय किंवा परेल येथील केईएम रुग्णालयात जावे लागते. येथील नागरिकांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या लक्षात घेता एम पूर्व विभागातील माहुल गाव परिसरात कायमस्वरुपी प्रसूतीगृह व दवाखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसूतीगृह व दवाखाना उभारण्यासाठी विविध विभागांच्या आवश्यक मंजूरी घेण्यात आल्या आहेत. मंजूरी घेतल्यानंतरच रुग्णालय उभारण्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच रुग्णालयाची इमारत उभारणीच्या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या प्रसूतीगृह व दवाखान्याच्या उभारणीसाठी साधारणपणे ३८ कोटी ४७ लाख ५० हजार ३३१ रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
खासदार संजय पाटील यांचा पाठपुरावा
घाटकोपर ते मुलुंड या भागातील रस्ता रुंदीकरण किंवा जलवाहिनीच्या आसपाच्या लोकांचे माहुल गावामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी नागरी सुविधा, आरोग्य सुविधा नसल्याने स्थानिकांनी खासदार संजय पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासोबत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न उपस्थित केला होता.