आरोग्य

उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातर्फे ९ महिन्यात १३ कोटी २५ लाखांची आर्थिक मदत

मुंबई :

गोरगरीब व गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अवघ्या ९ महिन्यात १३ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात सर्वसामान्य रुग्णांना करऱ्यात आली आहे.

जानेवारी ते सप्टेंबर २०२४ पर्यंत उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ४१८ रुग्णांना मदत करण्यात आली आहे. हृदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो प्रत्यारोपण, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. मदत करण्यात आलेल्या ४१८ रुग्णांना या मदत कक्षाकडून ९ महिन्यात १३ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या मदत कक्षाकडून गोरगरीब रुग्णांना धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक धर्मादाय रुग्णालयातील एकूण खाटांच्या १० टक्के खाटा या निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणे धर्मादाय रुग्णालयांना बंधनकारक आहे.

२४ तास मदतीसाठी हेल्पलाईन

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाशी नागरिकांना संपर्क साधता यावा यासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी १८०० १२३ २२११ या क्रमांकावर संपर्क साधाव. तसेच मदतीसाठी अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo@maharashtra. gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे

धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णाचा किंवा नातेवाईकांचा अर्ज, लोकप्रतिनीधींचे पत्र, आधार कार्ड किंवा ओळखपत्र, रेशनकार्ड किंवा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक आहे.

वार्षिक उत्पन्न मर्यादा

निर्धन रूग्णाकरीता वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख ८० हजारपर्यंत असून अशा रूग्णांवर धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तसेच गरीब रुग्णांसाठी १ लाख ८० हजार ते ३ लाख ६० हजार इतके वार्षिक उत्पन्न आहे. या दरम्यान वार्षिक उत्पन्न असलेल्या गरीब रूग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतात.

धर्मादाय रुग्णालयात १२ हजार खाटा राखीव

राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे ४६८ रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे १२ हजार खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये मुंबईतील कोकीळाबेन, एन.एन रिलायन्स, पुण्यातील सह्याद्री रुग्णालय, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय इत्यादी नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *