मुंबई :
विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर काम करणारे आजच्या पिढीतील निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक मराठमोळ्या चित्रपट संस्कृतीला साजेशी सिनेनिर्मिती करत आहेत. त्यापैकी एक दिग्दर्शक म्हणजे नितीन रोकडे. त्यांच्या ‘हुक्की’ या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘हुक्की’च्या मोशन पोस्टरमध्ये याची झलक अगदी सहजपणे पाहायला मिळते.
मॅजिक स्वान स्टुडिओज, एनएमआर मुव्हीज, फायनानशियल फिटनेस आणि जन्नत फिल्म्स या बॅनरखाली ‘हुक्की’ चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. नितीन रोकडे, सुनंदा काळुसकर आणि विनायक पाष्टे निर्माते असून सुधीर खोत आणि रईस खान हे ‘हुक्की’चे सहनिर्माते आहेत. नितीन रोकडे यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळली असून, त्यांना संदीप कुमार रॅाय आणि मधुलीता दास यांची पटकथा लेखनासाठी साथ लाभली आहे. अतिरीक्त पटकथा लेखन निनाद पाठक यांचं आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये कावळ्यांचा सुरेख वापर करण्यात आला आहे. सूरज, राममास्तर, महेश या कावळ्यांच्या गर्दीत प्रीती नावाची मैनाही मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळते. नावासोबतच प्रत्येकाचे स्वाभावही सांगण्यात आले आहेत. संघर्ष, जोखिम, विजय या मार्गावर एकीचे बळ पाहायला मिळणार असल्याचे संकेत मोशन पोस्टर देते. ‘आली हुक्की आता स्वत:साठी लढा…’ हा मंत्र या चित्रपटाद्वारे जनमानसापर्यंत पोहोचणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेलं मोशन पोस्टर नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारलेलं आहे. ‘हुक्की’ची कथा कोकणात घडत असल्याने तिथलं निसर्गरम्य वातावरण आणि नयनरम्य लोकेशन्स मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सूरज, प्रीती, रामकाका, महेश या भिन्न स्वभाव आणि प्रवृत्तींच्या व्यक्तिरेखांभोवती ‘हुक्की’चं धमाल कथानक लिहिण्यात आलं आहे. त्याला खुमासदार विनोदी संवादांची जोड देण्यात आली आहे. प्रसंगानुरुप विनोद निर्मिती या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरणार असल्याचं मत दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी व्यक्त केलं आहे. मोशन पोस्टरबाबत नितीन रोकडे म्हणाले की, यातील कावळे हे प्रतिकात्मक असून, याद्वारे मानवी स्वभावांचं दर्शन घडवण्यात आलं आहे. ‘हुक्की’ म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘हुक्की’ आली की कोणता माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. अशाच ‘हुक्कीबाज’ पात्रांची गंमतीशीर कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचंही रोकडे म्हणाले.
‘हुक्की’मध्ये प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या जोडीला रावी किशोर, प्रशांत मोहिते, महेश पाटील आदी कलावंत आहेत. प्रफुल-स्वप्नील या जोडीने या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. छायांकन फारुख खान यांनी केले असून, संतोष गणपत पालवणकर नृत्य दिग्दर्शक, साहस दृश्ये मास्टर संष कुमार यांची आहेत. तर हर्षित कुमार प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम पाहात आहेत.