मुंबई :
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दर वर्षी देण्यात येते.यंदा मात्र निधीची कमतरता असल्याने कारण देत ही रक्कम मिळण्याची शक्यता धूसर झाली असून ही रक्कम न देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दर वर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. गेल्या वर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना ५००० इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. सदरची घोषणा परिवहन खात्याचे मंत्री व त्या वेळचे अध्यक्ष म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर सर्व कर्मचारी व अधिकारी यांना ही रक्कम देण्यात आली. पण त्याला लागणारा ५५ कोटी रुपयांचा निधी महामंडळाचे वारंवार मागणी करूनही सरकारकडून देण्यात आला नाही. निधीच्या तुटवड्यामुळे या वर्षी एसटी महामंडळाने सावध पवित्रा घेतला असून दिवाळी भेट रक्कमे संदर्भात प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. सरकारकडून मुख्यमंत्री किंवा अन्य कुणी स्वतःहून या संदर्भातील घोषणा स्वतःहून करणार नाही तोपर्यंत निधी बाबतीत बोलायचे नाही. असा सावध पवित्रा घेण्यात आला आहे. निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून ही रक्कम न देण्याचा घाट घातला जात असल्याचे समजते आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे सरकारने दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी प्रमाणे नुसती घोषणा करून महामंडळाची व कर्मचाऱ्यांची फसवणूक करू नये, असेही बरगे यांनी म्हटले आहे.
महागाई भत्ता फाईल सरकार दरबारी धूळ खात
एसटी कर्मचाऱ्याना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. आता एसटी कर्मचाऱ्यांना ४६ टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र तो ५० टक्के इतका मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्याना ४ टक्के इतका महागाई भत्ता कमी मिळत असून तो देण्यासाठी साधारण १० कोटी रुपये इतकी रक्कम लागणार आहे. निधी उपलब्ध होण्यासाठी या संदर्भातील फाईल गेले अनेक महिने सरकार दरबारी धूळ खात पडून असून ती फाईल मंजूर करून जानेवारी २४ पासून थकबाकी फारकसह महागाई भत्त्याची रक्कम मिळण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. ही रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.