मुंबई :
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दर वर्षी देण्यात येते. या वर्षी मात्र महामंडळाच्या निधी मागणीच्या प्रस्तावावर सरकार कडून कुठलाच निर्णय अद्यापी न झाल्याने या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून प्रस्तावावर निर्णय न घेणारे सरकारी अधिकारी इतके असंवेदशिल आहेत का? अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दर वर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. गेल्या वर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना ५००० इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. या वर्षी एसटी महामंडळाने कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६००० रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचार संहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच १५ ऑक्टोंबर रोजी ५२ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावा संदर्भात एसटी महामंडळाने सरकारकडे निधी मिळावा यासाठी वारंवार विचारणा करूनही सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात असून अजूनही महामंडळाचा प्रस्ताव धूळखात पडून असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.
सरकारी अधिकारी असंवेदनशील
दिवाळी सण सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत. राज्यातील अनेक आस्थापनात दिवाळीसाठी काही ना काही रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार असून एसटी कर्मचारी मात्र अजूनही दुर्लक्षित राहिले आहेत. निधीच्या तुटवड्यामुळे एसटी महामंडळ ही रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळेच या रक्कमेची मागणी एसटी महामंडळाने सरकारकडे केली असून सरकारी अधिकारी असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. अजूनही वेळ गेलेली नसून सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. म्हणजे कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी आनंदात साजरी करता येईल. असेही बरगे यांनी म्हटले आहे.