मुंबई :
अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांना सप्टेंबर महिन्याचे मानधन न मिळाल्याने दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न आशा सेविकांसमोर उभा ठाकला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभागांतर्गत मुंबई जिल्हयात सुमारे १५०० आशा स्वयंसेविकांना नियुक्त केले आहे. त्यांना दरमहा १६५० व कामाचा मोबदला दिला जातो. त्यांना सुमारे दरमहा ६००० रुपयांपर्यंत मानधन मिळते, दिवाळीचा सण सुरु होऊनसुध्दा, महापालिकेतील आरोग्य विभागाने त्या आशा स्वयंसेविकांचे सप्टेंबर महिन्याचे थकित मानधन दिले नाही. महापालिका व आरोग्य सेविकांना दिवाळी निमित्त ऑक्टोबर महिन्याचे मानधन देखील देण्यात आले. मात्र आशा सेविकांना बोनसची मागणी करून बोनस तर मिळाला नाही पण एक सप्टेंबर महिन्याचे मानधन देखील दिलेले नाही. त्यामुळे दिवाळी साजरी तरी कशी करावी असा प्रश्न या आशा सेविकांसमोर उभा ठाकला आहे.
या सर्व आशा स्वयंसेविका गरीब कुटुंबातील असून, त्यांची नोकरी हे जगण्याने एकमात्र साधन आहे. दिवाळीपूर्वी अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे चालू महिन्याचे मानधन व बोनस देणे अपेक्षित. मात्र आतातरी उशीर न करता, त्यांना थकित मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघाचे कोषाध्यक्ष राजेश सिंग यांनी दिली.