क्रीडा

खो-खो स्पर्धा : दोन्ही गटात धाराशिव, सांगली विजेतेपदासाठी लढणार

धाराशिव : 

सुवर्ण महोत्सवी (५०वी) कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत कुमार व मुली या दोन्ही गटातून यजमान धाराशिव आणि सांगली यांच्यातच विजेतेपदासाठी अंतिम लढत होईल.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या उपांत्य सामन्यात सांगलीने सोलापूरला १०-७ असे तीन गुणांनी नमविले. मध्यंतराची ५-३ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. प्रतीक्षा बिराजदार हिने आपल्या धारदार आक्रमणात पाच गडी बाद करीत चार मिनिटे पळतीचा खेळ केला. सानिका चाफे हिने चार मिनिटे संरक्षण करीत तिला साथ दिली. सोलापूरच्या स्नेहा लामकाने (१.३०, १.४० मि. २ गुण) व प्राजक्ता बनसोडे (२.००, २.३०मि.) यांची खेळी अपुरी पडली.

दुसऱ्या सामन्यात धाराशिवने ठाण्यावर ११-७ असा डावाने विजय मिळविला. त्यांच्या विजयाचे शिल्पकार अष्टपैलू कामगिरी करणारे अश्विनी शिंदे (३ मि. व ३ गुण ) व प्रणाली काळे (४ मि. व २ गुण) हे ठरले. ठाण्याच्या दीक्षा काटेकर (२ गुण )हिचे प्रयत्न अपुरे पडले.

मुलांच्या उपांत्य सामन्यातही सोलापूरला सांगलीकडून १५-१९ अशी हार पत्करावी लागली. मध्यंतराची ७-१० ही पिछाडीच सोलापूरला महागत पडली. सांगलीच्या पार्थ देवकतेने आपल्या धारदार आक्रमणात सहा गडी बाद करीत १.१० मि. पळती केली. अथर्व पाटील यानेही (१.२०, १.४० मि. व ५ गुण) अष्टपैलू कामगिरी केली. सोलापूरकडून शुभम चव्हाण (१.२०, १.३० मि.) व अमरान शेख (१ मि. व ३ गुण) यांची लढत अपुरी ठरली.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात भरतसिंग वसावेच्या (१.४० मि. ३ गुण) अष्टपैलू खेळामुळे धाराशिवने पुण्यावर १३-१२ असा १ गुण व ४.५० मि. राखून विजय मिळविला. हरद्या वसावे (२, २.२० मि. व १ गुण ) याने त्याला साथ दिली. पुण्याच्या चेतन गुंडगल (१,१ मि. व ४ गुण ) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *