शहर

गुरूच्या विरोधात शिष्याचा लढा; माहीम विधानसभेत सैनिकांमध्ये कांटे की टक्कर

मुंबई : 

प्रेमात आणि युद्धात… सॉरी निवडणूकीच्या युद्धात सारेकाही माफ असते. एकेकाळी सदा सरवणकर यांचा शिष्य असलेले महेश सावंत आपल्या गुरुंविरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीम विधानसभेत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही आमदारकीचा टिळा तर लावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे माहीमचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी, राखण्यासाठी आणि परत मिळवण्यासाठी सारे सैनिक आपले सर्वस्वपणाला लावण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

माहीम विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. हा किल्ला राखण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी यंदा विभागप्रमुख महेश सावंत यांच्यावर सोपवली आहे. प्रभादेवीत लोकप्रिय असलेले महेश सावंत हे सदा सरवणकरांचे बोट धरूनच राजकारणात आले. सरवणकरच त्यांचे गुरू आणि गॉडफादर होते. सरवणकरांनीच महेश सावंत यांची कार्यशैली पाहून त्यांना २००३ साली शाखाप्रमुख केले. २००९ साली सरवणकरांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला तेव्हा महेशही त्यांच्यासोबत काँग्रेसवासी झाले होते. पण २०१४ साली दोघांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश केला. त्यानंतर २०१७ च्या मुंबई महानगर पालिका निवडणूकीपूर्वी यांच्यात पुत्रप्रेमामुळे काहीसे बिनसले. सरवणकरांनी महेश सावंत यांचे तिकीट कापत स्वताच्या मुलाला समाधान सरवणकरला तिकीट दिली होती. तेव्हा सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवत आपली ताकद दाखवली. अवघ्या अडीचशे मतांना सावंत यांचा पराभव झाला होता. पालिका निवडणूकीत पुत्राविरुद्ध लढलेले सावंत यंदा आपल्या एकेकाळच्या गॉडफादर आणि गुरूंविरुद्ध लढण्यासाठी तयार झाले आहेत.

माहीमचा किल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला असता तरी या किल्ल्यावर २००९ साली मनसेचे इंजिनही सुसाट धावले होते. मात्र त्यानंतर सदा सरवणकर यांनी हा बालेकिल्ला शिवसेनेला पुन्हा जिंकून दिला होता. ते आता विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार असले तरी त्यांच्याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. त्यांनी निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना सहकार्य करावे, अशी इच्छा भाजपाने व्यक्त केल्यापासून दादर-माहीममध्ये अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. जर सरवणकर रिंगणात उतरले तर यावेळीही २००९ प्रमाणे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी फायदा नवनिर्माण सेनेला नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ही तिरंगी लढत रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. गेल्यावेळी शिवसेना एकसंध होती, मात्र आता तिची दोन शकले पडली आहेत. एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी शिंदेची शिवसेना. त्यामुळे हा बालेकिल्ला दोघांनाही हवाय. शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी हा मतदारसंघ दोन्ही सेनेसाठी जीव की प्राण आहे. त्यातच मनसेनेही उडी घेतल्यामुळे या लढतीला तिरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे. या मतदारसंघात तिन्ही पक्षांची आपापली ताकद आणि आपापले हक्काचे मतदार असल्यामुळे लढत चुरशीची होणार याबाबत कुणाच्या मनात तीळमात्र शंका नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या सेनेने बाजी मारली असली तरी माहीम विधानसभेतून सदा सरवणकर यांनी राहुल शेवाळे यांना ६९४८८ मते मिळवून देताना १४९९० धावांची आघाडी दिली होती. म्हणजेच अनिल देसार्इंना माहीम विधानसभेतून ५५४९८ इतकी मते पडली होती. या निवडणूकीत अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांच्यात थेट लढत झाली आणि देसाई यांनी तब्बल ५३६८४ मतांनी विजय मिळवला होता.

आता विधानसभेच्या निवडणूकीत तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यामुळे बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र उभे राहिल्याने माहीमचे वातावरण वेगळ्याच धर्तीवर तापलेय. सरवणकरांनी निवडणूकीतून माघार घ्यावी म्हणून त्यांच्यावर वेगवेगळे दबावतंत्र अवलंबिले जात आहे. त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज दाखल केला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार त्यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. जर त्यांनी माघार घेतली तर माहीमला नवा आमदार लाभेल, हे निश्चित आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी माहीममधून तिरंगी लढत टाळण्याचा महायुती आणि मनसे प्रयत्न करत आहे. जर माहीममध्ये तिरंगी लढत झाली तर त्याचा थेट फायदा कार्यसम्राट महेश सावंत यांना होईल, असा अंदाज आहे. या तिरंगी लढतीत मराठी मतांचे मोठ्याप्रमाणात मतविभाजन पाहायला मिळू शकते. मात्र मुस्लिम मते पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पारड्यात एकगठ्ठा पडणार असल्यामुळे तिरंगी लढत महेश सावंतसाठी आनंदाची बातमी ठरू शकते.

माहीम मतदारसंघाला शिवसेनेचे दोन्ही गटच नव्हे तर महाराष्ट्र नवनिमार्ण सेनाही आपला बालेकिल्ला मानते. त्यामुळे तिन्ही पक्ष जिंकण्यासाठी आपापली ताकद लावणार, हे निश्चित आहे. मात्र निवडणूकीच्या संशयास्पद वातावरणामुळे मतदारराजा सरवणकरांना पुन्हा निवडून देतात की नव्या आमदाराला विधानसभेत पाठवतात, ते येत्या २३ तारखेलाच कळू शकेल.

सरवणकरांचे काय होणार ?

अत्यंत भावनिक वातावरणात सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असला तरी ते निवडणूक लढवणार की नाही, याचं अचूक उत्तर ४ नोव्हेंबरलाच मिळेल. जर त्यांना निवडणूकीत माघारच घ्यायची असती तर त्यांना अर्जच भरला नसता, असे त्यांचे समर्थक बोलत आहेत. त्यामुळे ते आता निवडणूकीलाही सामोरे जातील, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र येत्या आठवडाभरात त्यांच्यावर अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावली तर ते निवडणूक प्रचारातूनही गायब होतील. याचा थेट फायदा त्यांच्या एकेकाळच्या आवडत्या शिष्याला होईल. त्यामुळे माहीमचा किल्ला गुरू जिंकतो की शिष्य, हे पाहणे अत्यंत चुरशीचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *