मुंबई :
भारताच्या समृद्ध आणि ऐतिहासिक परंपरेतील दिवाळी सणाचे महत्व पटवून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘दिवाळी संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २६ हून अधिक देशातील वाणिज्य दुतावासांनी हा दीपोत्सव अनुभवला असून या परदेशी पाहूण्यांनी खास भारतीय व्यंजन आणि फराळाचा आस्वादही घेतला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या ऐतिहासिक सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह अर्जेंटिना, बहरीन, बेलारूस, ब्राझील, युके, चिली, चीन, फ्रान्स, झेक, इजिप्त, फिनलंड, इराण, इराक, आयर्लंड, इटली, जापान, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको, ओमन, नॉर्वे, रशिया, श्रीलंका, थायलंड, टर्की, आणि अमेरिका अशा विविध देशातील वाणिज्य दुतावास आणि ५५ हून अधिक देशातील मुंबई विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ असलेले परदेशी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी उपस्थित विविध देशातील वाणिज्य दुतावासांचे स्वागत करून दीपोत्सवाच्या शुभेच्छा देऊन भारताच्या समृद्ध आणि ऐतिहासिक परंपरेतील दिवाळी सणाचे महत्व सांगितले. दिवाळीसारख्या उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण सोबतच या सणाच्या दिव्यतेचा अंदाज येत असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित दुतावासांबरोबर संवाद साधताना पुढे ते म्हणाले, विद्यापीठातील स्कूल ऑफ फॉरेन लँग्वेजेसच्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांबरोबर संधीचे नवे दालन खुले करण्यासाठी विद्यापीठाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि साहचर्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यावरही भर दिला जात असून या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या सर्व भागधारकांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांशी सहकार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय संस्थासोबत सामंजस्य आणि भागीदारीला प्रोत्साहनही या केंद्राच्या माध्यमातून दिले जात असून अनेक परदेशी विद्यापीठांसोबत विद्यापीठाने शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. विविध करारांच्या अंतर्गत शैक्षणिक साधन संपत्तीचे आदान-प्रदान करणे, संयुक्त संशोधन आणि सह पदवीचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु करण्यात आले आहेत. सेंट लुईस विद्यापीठाच्या सहकार्यातून डेटा एनॅलिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी या उद्योन्मुख क्षेत्रातील सह पदवीचे शिक्षण विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी सेंटर फॉर एक्सलन्स इन हेल्थकेअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून मुंबई विद्यापीठ पर्ड्यू विद्यापीठासोबत कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या अशाच उद्योन्मुख क्षेत्रासह सेमी कंडक्टर क्षेत्रातकडे झेप घेण्यासाठी विद्यापीठ नियोजन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिवाळी संध्या कार्यक्रमात विद्यार्थी विकास विभागामार्फत सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक कलाकारांनी शास्त्रीय नृत्य, दिवाळी गाणी, लोकवाद्यवृंद, आदीवासी गौरनृत्य, दिंडी, आणि धुनूची सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. नीतिन आरेकर यांनी केले.