शहर

राज ठाकरे यांनी भेट नाकारली; महाविकास आघाडीला होणार फायदा – सदा सरवणकर

तिसऱ्या उमेदवारामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आघाडीला फायदा

मुंबई : 

माहिम मतदार संघाचे महायुतीचे उमदेवार आमदार सदा सरवणकर यांनी सोमवारी आपली उमेदवारी कायम ठेवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सरवणकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने अर्ज माघारीबाबत चर्चा झाली नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राज ठाकरेंनी भेट नाकारणे माझ्यासाठी वेदनादायक असल्याची खंत सरवणकर यांनी व्यक्त केली. तिसऱ्या उमेदवारामुळे मुंबईत काँग्रेस आघाडीचा फायदा होईल, असे सरवणकर म्हणाले.

मागील आठवडाभरापासून मुंबईतील माहीम मतदार संघ चर्चेचा विषय बनला होता. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहिम मतदार संघात मनसेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. या ठिकाणी तीनवेळा शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार म्हणून निवडून आले आहेत. महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना माहिममधून पुन्हा संधी दिली होती. मात्र सरवणकर यांनी अमित ठाकरेसाठी उमेदवारी मागे घ्यावी, अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्यात आले होते.

या दरम्यान सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना सोशल मिडियातून वारंवार विनंती केली. मात्र राज ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर भेट घेतली. राज ठाकरे महायुतीचे मित्र असून आपसांत चर्चेतून मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सरवणकर यांना दिले. त्यानुसार सरवणकर आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळील शिवसेना शाखेत ठाकरेंच्या भेटीसाठी वाट पाहत होते. राज यांनी भेट नाकारल्याचा निरोप समाधान सरवणकर यांनी आणला. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत. बाळासाहेबांनी ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना न्याय दिला तसा न्याय राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षित होता, मात्र भेट नाकारल्याने त्यांच्याशी संवाद झाला नाही. ते भेटले असते तर काही वेगळा निर्णय झाला असता, आता भेट नाकारल्याने जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवणे हाच पर्याय उरल्याचे सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गटप्रमुखपासून नगरसेवक ते आमदार असे मागील ३० वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. इथल्या प्रत्येक घराशी माझा परिचय आहे. मी माझ्या नावाने नाही तर केलेल्या कामांवर मत मागत आहे. आम्ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहोत. राज ठाकरेंची मैत्रिपूर्ण संबंध आहेत आणि त्यांच्याबद्दल आदर आहे. ते नक्कीच निवडणुकीसाठी आशीर्वाद देतील, असा विश्वास सरवणकर यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या उमेदवारामुळे काँग्रेस आघाडीचा फायदा

मनसेने मुंबईत २५ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मागील अनेक निवडणुकीत मनसेमुळे मराठी मतांचे विभाजन झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना फायदा होईल. याशिवाय मनसेच्या मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाजाविरोधातील आक्रमक भूमिकेमुळे त्यांना दादर माहिम मतदार मुस्लिम, उत्तर भारतीय, गुजराती आणि मारवाडी मते मिळणार नाहीत. त्यामुळे मनसेचा उमेदवार देणे म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासारखे आहे, असे येथील शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *