मुंबई :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २०२४ मध्ये १० नोव्हेंबर २०२४ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ३७ जिल्ह्यांच्या मुख्यालय ठिकाणी एकूण १०२३ केंद्रावर परीक्षा विहित वेळेत पार पडली आहे. या परीक्षेला ३ लाख २९ हजार ३४६ उमेदवार उपस्थित होते. म्हणजेच एकूण ९३.०५ टक्के उमेदवार उपस्थित होते.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) पेपर एकसाठी ४२८ केंद्र तर पेपर २ साठी ५८५ केंद्र सज्ज ठेवण्यात आले होते. पेपर १ साठी १ लाख ५२ हजार ६०५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ४२ हजार २५९ उमेदवारांनी परीक्षा दिली. म्हणजे ९३.२२ टक्के उमेदवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे पेपर दोनसाठी २ लाख १ हजार ३४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ८७ हजार ८७ उमेदवारांनी परीक्षा दिली. म्हणजे ९२.९२ टक्के उमेदवार उपस्थित होते. पेपर १ आणि पेपर २ साठी एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यातील ३ लाख २९ हजार ३४६ उमेदवार उपस्थित होते. म्हणजेच एकूण ९३.०५ टक्के उमेदवार उपस्थित होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बंडसे यांनी दिली.
प्रत्येक केंद्रावर व प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले होते. कॅमेऱ्याचा Live Access व Artificial Intelligence Based Serveilliance, Frisking (HHMD), परीक्षार्थीचे बायोमेट्रीक व Face Recognition, इ. आवश्यक यंत्रणेमार्फत निकोप वातावरणात घेण्यात आले. शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष व जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सर्व केंद्रावर परीक्षार्थी तपासणीकामी आवश्यक यंत्रणा बसविण्यात आलेली होती. शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण जिल्हा कक्ष व राज्य नियंत्रण कक्षाकडून अतिशय चोख असल्याने केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार निदर्शनास आला नाही. या परीक्षेकामी राज्य परीक्षा परिषदेशी अधिकारी कर्मकारी तसेच जिल्हा स्तरावरुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक/ योजना) यांनी शिक्षक पात्रता परीक्षेचे कामकाज दक्षतेने पार पाडले.
शिक्षक पात्रता परीक्षा दिनी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, सहा, संचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक/ योजना) यांनी परीक्षेदरम्यान केंद्रांना भेटी दिल्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बंडसे यांनी दिली.