मुंबई :
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या पूनर्परीक्षांचे (एटीकेटी) निकाल वेळेत जाहीर करण्यात विद्यापीठाने यश मिळवले आहे. या परीक्षांतील तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ चा निकाल ९ दिवसात तर बीकॉम सत्र ६ चा निकाल अवघ्या १६ दिवसात जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर बीकॉम अकाऊंट अँड फायनान्स सत्र ६ परीक्षेचा निकाल २२ दिवसात तर बीएमएस सत्र ६ परीक्षेचा निकाल २० दिवसात जाहीर करण्यात आला आहे.
हिवाळी द्वीतीय सत्र २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बीकॉम सत्र ६ एटीकेटी परीक्षेसाठी १४ हजार १९१, तर बीएस्सी सत्र ६ साठी २ हजार ९२६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. बीकॉम अकाऊंट अँड फायनान्ससाठी १ हजार ३१ तर बीएमएस परीक्षेसाठी १ हजार ५४९ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्याचबरोबर बीफार्म सत्र ८ चा निकाल १८ दिवसात तर बीआर्च सत्र ६ चा निकाल १४ दिवसात जाहीर करण्यात आला. जाहीर केलेले हे सर्व निकाल मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. मूल्यांकनाचे काम जलदगतीने करून विहीत कालावधीच्या आत निकाल जाहीर केल्याबद्दल सर्व संबंधित शिक्षक आणि प्रशासकीय यंत्रणेचे त्यांनी आभार मानले. तसेच उर्वरित परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.