मुंबई :
स्व.दिना बामा पाटील यांच्या ९० व्या जयंती निमित्त दिना बामा पाटील लायब्ररी, स्टडी सेंटर व साहित्ययात्रा यांच्या वतीने भव्य अशा ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मा. आ. रमेश कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मुख्य विश्वस्त मा. सौ. पल्लवीताई संजय पाटील याची उपस्थिती होती. २०१५ पासून दिना बामा पाटील वाचनालयाच्यावतीने असे प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते. वाचनसंस्कृती वाढावी, रुजावी, तिचे पालनपोषण व्हावे म्हणून हे प्रदर्शन भरवले जाते. २४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन उघडे राहणार आहे. नागरिकांनी प्रदर्शनास भेट दयावी. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी हजारो पुस्तक प्रेमींनी हजेरी लावत पुस्तकांची खरेदी केली. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाची असलेली अनेक पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. देश विदेशातील लेखकांची अनेक पुस्तके या ठिकाणी असून शंभर रुपयांत काही दर्जेदार पुस्तकांची खरेदी करता येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत अनेक पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.
मुंबईतील कामगारांचा आवाज, श्रमिकांचे नेते, माजी आमदार स्व. दिना बामा पाटील यांच्या जयंती निमित्त भांडुप येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या जयंती निमित्त २४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान पुस्तकांचे प्रर्दशन ठेवण्यात आले आहे. तर ६ ते ८ डिसेंबर दरम्यान पुस्तकांचे अदान प्रदान करण्यात येणार आहे. कामगार समाज सुधारण्यासाठी त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे. म्हणुन भांडुप, मुलुंड व कोकणासह मुंबई विभागात अनेक शिक्षणसंस्थांना दिना बामा पाटील यांनी मदत केली. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पल्लवी संजय पाटील यांनी दिना बामा पाटील वाचनालय व अभ्यासिकेची सुरुवात केली.
स्व. दिना बामा पाटील यांच्या जयंती निमित्त भांडुप येथे दिना बामा पाटील सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेच्यावतिने ‘चला अधिकारी होऊ या’ स्पर्धा परीक्षा विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एमपीएससी, यूपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी. एमपीएससी परीक्षेचे बदलते रुप, अभ्यासक्रमाची समज व उकल, यूपीएससी चा अभ्यासक्रम व आपल्या मनातील शंका आदी बाबतीत स्पर्धा परीक्षा संदर्भात ठाण्यातील द युनिक अकॅडमीच्या समन्वयक प्रा. माधवी तटकरे या मार्गदर्शन करणार आहेत.