शहर

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीकच्या भूयारी मार्गात अद्ययावत वायूविजन प्रणाली

मुंबई :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भूयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली नव्या तंत्रज्ञानासह अंमलात येत आहे. भूयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी नव्या वायूविजन प्रणालीमुळे मदत होणार आहे. परिणामी, भूयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दी असताना होणारी अस्वस्थतता कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच भूयारी मार्गातील गरम हवा बाहेर टाकण्याचे काम मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचल्यानंतर प्रवासी, पादचारी, पर्यटक यांच्यामार्फत भूयारी मार्गाचा वापर करण्यात येतो. भूयारी मार्गाच्या ठिकाणी खेळती हवा रहावी, यासाठी प्रणाली अस्तित्वात आहे. असे असले तरी याअनुषंगाने भूयारी मार्गाचा होणारा आत्यंतिक वापर पाहता आधुनिक व अद्ययावत उपाययोजना करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार अधिक क्षमतेचे वायूविजन आणि हवा खेळती राहील याअनुषंगाने अद्ययावत प्रणाली संपूर्ण भूयारी मार्ग परिसरात अंमलात आणण्यात आली आहे.

भूयारी मार्गाच्या ठिकाणी अद्ययावत वायूविजन प्रणालीअंतर्गत एकूण ९ जेट पंखे (फॅन्स) संपूर्ण भूयारी मार्ग परिसरात लावण्यात येत आहेत. या जेट पंख्यांमुळे भूयारी मार्गाच्या प्रवेशाच्या ठिकाणची हवा आतमध्ये वेगाने आणण्यासाठी मदत होईल. तसेच २ अधिक क्षमतेचे पंखे मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात येत आहेत. या दोन पंख्यांमुळे मध्यवर्ती ठिकाणी भूयारी मार्ग परिसरातील हवा बाहेर टाकण्यासाठी मदत होणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात हवा खेळती रहावी, यासाठी एखाद्या बोगद्यात ज्या पद्धतीने वायूविजन प्रणाली वापरली जाते, त्यानुसारच या भूयारी मार्गाच्या ठिकाणीही या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

आगीच्या घटनांमध्येही प्रणालीचा वापर

आगीसारख्या संभाव्य घटनांचा देखील विचार ही प्रणाली स्थापित करताना करण्यात आला आहे. आगसदृश्य संभाव्य प्रसंगी या यंत्रणेतील मध्यवर्ती पंखे हे अधिक क्षमतेने आणि दुप्पट वेगाने सक्रिय होतील. परिणामी धूर वेगाने बाहेर टाकण्यासाठी या प्रणालीची मदत होईल. त्यामुळे भूयारी मार्ग परिसरात वावरताना नागरिकांना दृश्यमानतेसाठीही त्याची मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *