शिक्षण

प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर न केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी महाविद्यालयाची

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील आवश्यक कागदपत्रे येत्या ८ दिवसात विहित शूल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर २०२४ ही शूल्कासह कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मूदत उलटूनही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील कागदपत्रे अद्याप विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीत. विहीत मुदतीत जमा न केलेल्या कागदपत्रांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले जातात, पर्यायाने पुढील शिक्षण आणि नोकरीच्या संधीमध्ये संभाव्य बाधा निर्माण होत असतात. त्यामुळे येत्या ८ दिवसात विहित शूल्कासह विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे विद्यापीठाकडे तात्काळ जमा करण्यात यावेत तसेच यापूढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या संभाव्य शैक्षणिक नुकसानाची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांची असणार असल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे विहित मुदतीत जमा करण्यासाठी परिपत्रानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते. प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर त्याची नाव नोंदणी व पात्रता बाबतचे दस्तऐवज त्याच वर्षात जमा करणे आवश्यक असतानाही अनेक महाविद्यालयांमार्फत विहित मुदतीत कागदपत्रे सादर केली जात नाहीत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षात विविध अभ्यासक्रमांना प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे पात्रतेसंबंधीत अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विद्यापीठामार्फत सुरुवातीला १५ फेब्रुवारी २०२४ या तारखेपर्यंत विहित शूल्कासह कागदपत्रे जमा करण्यासाठी कळविण्यात आले होते. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२४ ही मुदतवाढ देण्यात आली होती.

वारंवार सूचना करूनही विहीत कालावधीत शुल्कासह ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पात्रता आणि नाव नोंदणीचे कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा केली नाहीत अशा महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार. तसेच अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठामार्फत रद्द केले जातील याची सर्वस्व जबाबदारी संबधित महाविद्यालांची असणार असल्याचेही विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *