मुंबई :
माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलतर्फे आयोजित अमृत महोत्सवी आंतरशालेय खो-खो स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू असून, आज झालेल्या मुलांच्या उपांत्य फेरीतील चुरशीच्या सामन्यांमध्ये अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले.
पहिल्या उपांत्यफेरीत सरस्वती मंदिर हायस्कूलने शारदाश्रम विद्या मंदिरला ८-६ असा अटीतटीच्या लढतीत पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सरस्वती संघाकडून ओम ननावरे (संरक्षणात १:३० मि. व ३:४० मि., आक्रमणात १ गुण), शिवम झा (संरक्षणात १:१० मि. नाबाद, आक्रमणात २ गुण) आणि नॉयल हेलन (संरक्षणात ३:३० मि.) यांच्या उत्कृष्ट खेळीने विजय निश्चित केला. शारदाश्रमकडून विराज खेडेकर (संरक्षणात १:३० मि., आक्रमणात ३ गुण) आणि निहाल पंडित (संरक्षणात ३:३० मि. व २ मि., आक्रमणात १ गुण) यांनी चमकदार खेळ केला, पण संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.
दुसऱ्या उपांत्यफेरीत डी. बी. कुलकर्णी हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरवर १३-५ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. डी. बी. कुलकर्णी संघाकडून आदर्श रुके (संरक्षणात ४:३० मि., आक्रमणात १ गुण), अफसार शेख (संरक्षणात २:२० मि., आक्रमणात १ गुण) आणि कार्तिक तोरस्कर (संरक्षणात २ मि. नाबाद, आक्रमणात ३ गुण) यांनी अप्रतिम खेळ दाखवला. अहिल्या विद्या मंदिरकडून अर्णव गावडे (संरक्षणात १ मि., आक्रमणात १ गुण) आणि साईराज कुबल (आक्रमणात १ गुण) यांनी संघाला झुंजवण्याचा प्रयत्न केला, परंतु विजय मिळवण्यात अपयश आले.
आता अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूल आणि डी. बी. कुलकर्णी हायस्कूल यांच्यात चुरशीची लढत होणार असून, दोन्ही संघांकडून उत्कंठावर्धक खेळाची अपेक्षा आहे.