ठाणे :
क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्याचा १३१ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या मर्यादित ४० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दणदणीत पराभव केला. राजावाडी क्रिकेट क्लबने ५ बाद २३६ धावांचा बचाव करताना माटुंगा जिमखान्याला ३३ षटकात १०५ धांवावर गुंडाळत दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय माटुंगा जिमखान्यासाठी फायदेशीर ठरला नाही. क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेने अर्धशतकी खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. क्षमाने १२ चौकारासह ६३ धावांची खेळी केली. निव्याने नऊ चौकार मारत ५३ धावा केल्या. दिक्षा पवारने नाबाद ३३ आणि किमया राणेने २४ धावा केल्या. माटुंगा जिमखान्याच्या त्रिशा परमारने दोन, समीक्षा घाडगे, अनन्या शेट्टी आणि रेनी फर्नांडेझने प्रत्येकी एक बळी मिळवले.
उत्तरादाखल राजावाडी क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवताना थोड्या थोडया धावांच्या फरकाने फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून विजय साकारला. पराभूत संघाकडून रेनी फर्नांडेझने सर्वाधिक २७, तिशा कपूरने नाबाद १७ आणि गार्गी बांदेकरने १७ धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. विजयी संघाच्या क्षमा पाटेकर, वैष्णवी पोतदार, निव्या आंबरे आणि तनिशा धनावडेने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. निवेदी जैतपालने एक बळी मिळवला. क्षमा पाटेकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक :
राजावाडी क्रिकेट क्लब : ४० षटकात ५ बाद २३६ ( क्षमा पाटेकर ६३, निव्या आंबरे ५३, दिशा पवार नाबाद ३३, किमया राणे २४, त्रिशा परमार ७-१-३२-२, समीक्षा घाडगे ३-१९-१, अनन्या शेट्टी ८-३८-१, रेनी फर्नांडेझ ८-५३-१) विजयी.
माटुंगा जिमखाना : ३३ षटकात सर्वबाद १०५ ( रेनी फर्नांडेझ २७, तिशा नायर नाबाद १७, गार्गी बांदेकर १७, निव्या आंबरे ८-१-२१-२, क्षमा पाटेकर ५-२०-२, वैष्णवी पोतदार ५-२२-२, तनिशा धनावडे ५-२१-२, निवेदी जैतपाल ४-९-१).
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – क्षमा पाटेकर.