मुंबई :
महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४२ वी आंतर महाविद्यालयीन खो-खो (मुले व मूली) स्पर्धा मनोरंजन मैदान, पेरू कंपाउंड, लालबाग येथे पार पडली. या स्पर्धेत मुलांचे विजेतेपद झुनझुनवाला महाविद्यालयाने तर मुलींचे विजेतेपद एस. एस. टी. महाविद्यालयाने मिळवले.
मुलांच्या अंतिम सामन्यात झुनझुनवाला महाविद्यालयाने डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा २.४० मि. राखून १२-११ असा एक गुणाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात झूनझुनवालाच्या प्रथमेश दुर्गावले (४.३० मि. संरक्षण व १ गुण), सदाशिव पालव (२ मि. संरक्षण . व २ गुण), धिरज भावे (३.२० मि. संरक्षण व १ गुण), शुभम शिंदे (३.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दमदार खेळ करत विजेतेपद मिळवले. तर पराभूत आंबेडकरच्या राहूल जावळे (३.३० मि. संरक्षण व ३ गुण), अथर्व पाष्टे (२ गुण), ओंकार मिरगळ (२.३० मि. संरक्षण), हर्षे कामतेकर (१.४० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी विजयासाठी जोरदार लढत दिली मात्र त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
मुलींच्या अंतिम सामन्यात एस. एस. टी. महाविद्यालयाने एस.एन.डि.टी. महाविद्यालयाचा १४-०६ असा ८ गुणांनी धुव्वा उडवत विजेतेपद मिळवले. या सामन्यात एस. एस. टी. च्या कल्याणी कंक (२ मि. संरक्षण व ५ गुण), मिना कांबळे (१ मि. संरक्षण व १ गुण), काजल शेख (नाबाद ३.३० मि. संरक्षण व ४ गुण), किशोरी मोकाशी (२ मि. संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार खेळ करत एस.एन.डि.टी. च्या खेळाडूंना संपूर्ण सामन्यात डोक वर काढायला संधीच दिली नाही व त्यांनी या विजेतेपदावर रुबाबात नाव कोरल. तर पराभूत एस.एन.डि.टी. च्या खुशबू सूतार (२.४० मि. संरक्षण व १ गुण), रिया कदम (१.३० मि. संरक्षण व १ गुण), आर्या तावडे (१ गुण) व नम्रता पांडे यांनी दिलेली लढत त्यांना पराभवापासून वाचवू शकली नाही.
मुलांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात एस. एस. टी. महाविद्यालयाने किर्ती महाविद्यालयाचा १ ३० मि. राखून ६-५ असा एक गुणाने पराभव केला. या सामन्यात एस. एस. टी.च्या ऋशीकेष चोरगे (२.४० मि. संरक्षण), प्रवीण मसकर (१.२० मि. संरक्षण व १ गुण), विकास डोंगरे (१:३० मि. नाबाद), निखील कदम (२ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली तर पराभूत किर्ती महाविद्यालयाच्या ओमू भरणकर (१ मि. संरक्षण, १ गुण ), तन्मय भुवड (१ गुण) सिधार्थ चव्हाण (२ गुण) प्रतिक होडावडेकर (१.३० मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली व त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
मुलींच्या तृतीय क्रमांक सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालयाने किर्ती महाविद्यालयाचा २-१ असा १ मि. राखून १ गुणाने विजय मिळवला. महर्षी दयानंद मानसी आंबोरकर ( नाबाद ४ मि. संरक्षण), काजल मोरे (३ मि. संरक्षण), अर्पिता तोरसकर (१ गुण) व जानवी लोटे (१ गुण) यांनी विजयात महत्वपूर्ण कामगिरीची नोंद केली तर पराभूत किर्ती महाविद्यालयाच्या पूर्वा तटकरे (३.३० मि. संरक्षण), सुप्रिया नाईक, अदिती परब व दिक्षा तांबे यांनी दिलेल्या लढतीत त्यांच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला.