मुंबई :
जन्मजात असलेल्या हृदयदोष वयाच्या १६ व्या वर्षी कळल्याने एका मुलीच्या व तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. या आजारावर सरकारी रुग्णालयामध्ये पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया होत असल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा खर्च आवाक्याच्या बाहेर असल्याने त्यांनी जे.जे. रुग्णालयात धाव घेतली. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी अद्ययावत पद्धतीने तब्बल चार तास यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करत तिला जीवदान दिले आहे.
बारामती तालुक्यात एका छोट्या गावात राहणाऱ्या या १६ वर्षीय मुलीला अचानक श्वसनाचे त्रास सुरू झाला. तिला धाप लागू लागली. वर्षभर तिला हा त्रास होत होता. अनेक स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी जाऊनही तिच्या आजाराचे निदान होत नव्हते. यामुळे तिचे कुटुंब हतबल झाले होते. अखेर त्यांनी जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी येण्याचा निर्णय घेतला. जे.जे. रुग्णालयात तिची २ डी इको तपसाणी केल्यानंतर तिच्या हृदयात २१ मिमीचा इन्लेट व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (व्हीएसडी) हा जन्मजात हृदयदोष असून, हृदयाला छिद्र असल्याचे सिद्ध झाले. यावर योग्य वेळी उपचार न केल्याने हा आजार गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतो. यामुळे मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता आहे. या मुलीला व तिच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता. मुलीच्या कुटुंबियांनी तिला या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये पारंपरिक व अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे त्यांना समजले. सरकारी रुग्णालयामध्ये पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया होतात. यामध्ये छातीची हाडे कापून (स्टर्नीटॉमी) शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये संसर्गाचा धोका, वेदना आणि दीर्घकालीन रुग्णालयीन उपचार करावे लागतात. खासगी रुग्णालयामध्ये अद्ययावत शस्त्रक्रियेसाठी प्रचंड खर्च असून, तो या मुलीच्या पालकांच्या आवाक्याबाहेर होता. अखेरीस या मुलीच्या कुटुंबियांनी जे.जे. रुग्णालाच्या कार्डिओ थोरॅसिक शस्त्रक्रिया विभागातील सहायोगी प्राध्यापक डॉ. सूरज वासुदेव नागरे यांच्या माध्यमातून आशेचा किरण मिळाला. त्यांनी कमी त्रास होणाऱ्या व्हीएसडी शस्त्रक्रियेची माहिती दिली. या पद्धतीमध्ये फक्त ५ सेंमी छातीच्या बाजूने चिरा दिली जाते. यामुळे वेदना कमी होतात, जखम लवकर बरी होते, आणि मोठी खूण राहत नाही. मुलीच्या पालकांच्या संमतीनंतर जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या तुकडीने चार तासांमध्ये शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. जे जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागप्रमुख डॉ. आशिष राजन भिवापूरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ नागरे यांनी ही शस्त्रक्रिया केली. यासाठी त्यांना डॉ. दीपक जैस्वाल, डॉ. अक्षय वर्मा, डॉ. तन्मय पांडे, डॉ. अश्विन सोनकांबळे तसेच स्टाफ नर्स अनघा साखरकर, मिताली सावंत आणि राजू दौड यांनी सहकार्य केले. तसेच ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आल्याने या मुलीच्या कुटुंबावर कोणताही आर्थिक भार पडला नाही.
शस्त्रक्रियेनंतर, रुग्णाचा पुनर्वसनाचा वेग चकित करणारा होता. चौथ्या दिवशी कोणत्याही गुंतागुंतीशिवाय तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णाचे कुटुंब सरकारी रुग्णालयात इतक्या वेगाने झालेल्या उपचारांनी आनंदित झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी जे.जे. रुग्णालयाचे आभार मानले. प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शास्त्रकिया भविष्यात रुग्णांच्या जीवनशैलीत लवकर सुधारणा घडवून आणतील, असा विश्वास कार्डिओ थोरॅसिक शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. भिवापूरकर यांनी व्यक्त केला.
हे इनोव्हेटिव्ह कार्डिअक शस्त्रक्रियेच्या प्रवासातील हे पहिले पाऊल आहे. पुढील काळात सीव्हीटीएस विभाग आणखी मोठ्या यशाने जे जे रुग्णालयाचे नाव उज्ज्वल करेल.
– डॉ. सूरज नागरे, कार्डिओ थोरॅसिक शस्त्रक्रिया विभाग, जे.जे. रुग्णालय