मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील नव उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप बाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या ‘एमयू आयडीयाज फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटर’ च्या सहकार्याने स्टार्टअप मंथन १.० च्या माध्यमातून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या एक दिवसीय कार्यशाळेला विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप, संचालक नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे डॉ. सचिन लढ्ढा, गरवारे व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक, इन्स्टिट्युट फॉर द डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मॅझरिंग इन्स्ट्रुमेंट्सचे आयुष रायसोनी यांच्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रांतील विद्यार्थी, संशोधक, शिक्षक आणि उद्योजक उपस्थित होते.
या कार्यशाळेत संज्ञापन व पत्रकारिता विभागातील नवप्रतिभावंतांच्या नव संकल्पनाना मूर्त रुप देण्यासाठी आणि नव उद्योजकतेला चालना तसेच विद्यापीठाच्या एमयू आयडीयाज फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटर’च्या माध्यमातून स्टार्टअप मध्ये रुपांतर करण्यासाठी डॉ. सचिन लढ्ढा यांनी मार्गदर्शन केले. आयुष रायसोनी यांनी ‘एआय पॉवर्ड फिल्ममेकिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर डिजीटल मीडियाच्या वापरातून एखाद्या उद्योग समूहाच्या वितरकामार्फत थेट माल विविध व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरविता येऊ शकत असल्याची संकल्पना डॉ. केयूर कुमार नायक यांनी मांडली. तसेच त्यासाठी शून्य पैशाची गुंतवणूक लागत असून त्यातून स्वत:चे जाळे पसरवून मोठा उद्योग उभा करु शकत असल्याचे त्यांनी सांगितले. विभागातील माजी विद्यार्थी युक्ती मीडिया कन्सल्टन्सीचे संस्थापक प्रमोद सावंत यांनी २०१० मध्ये सुरू केलेल्या आपल्या जनसंपर्क संस्थेची यशोगाथा सांगितली. तर दुसऱ्या माजी विद्यार्थी डॉ. अमरीन मोगर यांनी युनिव्हर्सल रीच फाउंडेशन या आपल्या स्टार्टअपची यशोगाथा विशद करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना नव उद्योजकतेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्याचे आवाहन केले.