मुंबई :
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये श्री. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी टाळ्यांच्या कडकडाटात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे स्मरण केले. तसेच भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर शपथेपूर्वी राज्यातील १३ कोटी जनतेचे श्री. शिंदे यांनी आवर्जून आभार मानले. मुंबईतील आझाद मैदानात पार पडलेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह प्रमुख केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले होते. महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आज शपथ घेतली. श्री.एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अडीच वर्षात जनहिताच्या योजना राबवणाऱ्या एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आजच्या शपथविधी कार्यक्रमातून दिसून आली. शिंदे यांनी शपथ घेताना हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले. तसेच मागील अडीच वर्ष भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिले.
शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, पक्षाच्या सर्व आमदार आणि माजी मंत्र्यांच्या वतीने श्री. एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह करण्यात आला. शिंदे यांनी सुरु केलेल्या योजनांना पुढे नेण्यासाठी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे, अशी कळकळीची विनंती केली होती, ती विनंती शिंदे यांनी मान्य केली. सामंत पुढे म्हणाले की, हिंदुत्व हा महायुतीचा पाया आहे. एक जबाबदार घटक पक्ष म्हणून आम्ही जनतेच्या जनादेशाचा आदर करतो. शिवसनेने महायुतीचा धर्म पाळला आणि महाराष्ट्राला स्थिर आणि प्रभावी सरकार देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे सामंत म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नागरिकांच्या आकांक्षा जाणतो आणि प्रत्येकासाठी सुशासन सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे वचन देतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जनतेसाठी माझे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि मी समाजातील सर्व घटकांची अटळ समर्पण आणि उत्कटतेने सेवा करत राहीन. माझ्यासाठी, सार्वजनिक सेवा कोणत्याही पद किंवा पदापेक्षा जास्त आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुमच्या सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले.