आरोग्य

थर्टी फर्स्टच्या पार्टीनिमित्त हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमधील फूडवर एफडीएची नजर

मुंबई :

सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाचे स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. यावेळी हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकाकडून निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थाचा पुरवठा होऊ नये. तसेच अन्न विषबाधा होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल व्यावसायिकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी ५ ते ३१ डिसेंबरदरम्यान मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन नेहमीच कार्यरत असते. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाचे स्वागत मोठया उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. यावेळी हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून विविध अन्न पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. परिणामी या ठिकाणी अन्न पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अन्न पदार्थाच्या वाढती मागणी लक्षात घेता हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब चालवणाऱ्या अन्न व्यवसायिकाकडून निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थाचा पुरवठा होण्याची शक्यता अधिक असते. तसेच यामुळे अन्न विषबाधेसारखी घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना निर्भेळ, सकस व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करुन देता यावीत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून ५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि कॅन्टीन या आस्थापणांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.

या मोहीमे दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि कॅन्टीन या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब चालकांविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदींनुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहितीही माने यांनी दिली.

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाचा १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई चे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *