मुंबई :
जे.जे. रुग्णालयामधील परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून करण्यात आली आहे. मात्र भारतीय परिचर्या परिषदेच्या मानांकनानुसार ही नियुक्ती गैर असून, यामुळे परिचर्या शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी अडचणी येऊ शकतात. परिणामी जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संंस्थेतील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या नियुक्तीला विरोध करत आंदोलन पुकारले आहे.
जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने त्यांच्याकडील या पदाचा भार जे.जे. रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र हा पदभार सोपविताना भारतीय परिचर्या परिषदेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा दावा परिचर्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. भारतीय परिचर्या परिषदेच्या नियमांनुसार परिचर्या महाविद्यालातील प्राचार्य पदासाठी परिचारिका संवर्गातून एमएस्सी नर्सिंग किंवा डॉक्टरेट पदवी मिळवलेली व्यक्ती पात्र असते. तसेच त्या व्यक्तीला परिचारिका संवर्गामध्ये किमान १० वर्ष शिकविण्याचा अनुभव असणे अपेक्षित आहे. ही किमान अर्हता असलेली व्यक्तीच संस्थाप्रमुख होऊ शकते. मात्र जे.जे. रुग्णलयातील परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करताना हा नियमाकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. ही नियुक्ती तातडीने रद्द करून संबंधित पदावर परिचर्या संवर्गातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेतील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बुधवारपासून साखळी उपोषण पुकारले आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिली असे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे परिचर्या शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय परिचर्या परिषदेकडे नोंदणी करताना ‘सी’ अर्ज भरावा लागतो. या अर्जावर संस्थाप्रमुखांची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र संस्थाप्रमुख हे परिचर्या संवर्गातील नसल्याने हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या नियुक्तीमुळे परिचर्या संवर्गातील एका महत्त्वाच्या पदावर डॉक्टर संवर्गातील व्यक्तीच्या नियुक्तीचा चुकीचा पायंडा कायम होऊन भविष्यात परिचर्या संवर्गातील एका पदाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिचर्या क्षेत्रात मास्टर किंवा डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.