शिक्षण

मुंबई विद्यापीठाचा पेट परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई :

मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) २०२४ चा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेचा निकाल ५३ टक्के इतका लागला आहे. सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण ३७९४ विद्यार्थी बसले होते.

पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षेसाठी (पेट) ५०४० एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यापैकी एकूण ३७९४ एवढे विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २००८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे परीक्षेचा निकाल ५३ टक्के इतका लागला आहे. परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्याना त्यांच्या ईमेल लॉगिन मध्ये या परीक्षेचे प्रमाणपत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. विद्याशाखानिहाय या परीक्षेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखेसाठी सर्वाधिक ९२१ , वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी ४४६, मानव्यविद्या शाखेसाठी २७५ आणि आंतर विद्याशाखेसाठी ३६६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्याना मिळणारे प्रमाणपत्र हे विशेष फीचर क्यूआर कोडयुक्त असून ऑनलाइन पडताळणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. दिनांक १७ आणि २४ नोव्हेंबर २०२४ रोजी विविध केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही परीक्षा केंद्रांवर झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. काही विद्यार्थ्यांची परीक्षा विलंबाने सुरू झाल्याने त्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *