मुंबई :
भाषा या आपल्या संस्कृती, वारसा आणि ज्ञानाच्या वाहक आहेत त्यामुळे भारतीय भाषा लोकमानसात कायम प्रभावी राहाव्यात तसेच संशोधन व प्रसार या प्रयत्नातून चिरंजीवी राहाव्या यासाठी मुंबई विद्यापीठात भारतीय भाषा संवर्धन व प्रसार केंद्राची स्थापना केली जात आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातील मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि अवेस्ता पहलवी अशा भाषांसह घटनेत अनुसूचित असलेल्या २२ भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत या अनुषंगाने ठराव करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राचे महत्व अधोरेखित होणार आहे.
भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा, त्यावरील अध्ययन आणि संशोधन तसेच भाषिक विविधता ही देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा समजला जातो. अनेक भारतीय भाषांना समृद्ध साहित्यिक परंपरा आणि अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या विविध भाषेतील दर्जेदार साहित्यकृती इतर भाषेत भाषांतरित करणे, प्रादेशिक भाषेतील ज्ञान संपत्तीची वृद्धी करणे, विविध भाषेत साहित्य तयार करणे त्याचबरोबर भारतीय भाषांमध्ये भाषांतर आणि शैक्षणिक लेखनाद्वारे अभ्यास सामग्री वाढवणे आणि मूळ पुस्तक लेखनासाठी परिसंस्था निर्माण करणे यासाठी या केंद्राचे महत्व अधोरेखित होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. विशेष म्हणजे अभिजात मराठी भाषेतील दर्जेदार साहित्यकृती इतर भाषेत भाषांतरित करणे, इतर भाषांतील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत भाषांतरित करणे, त्याचबरोबर बोलीभाषांना संगणकीय सहाय्याच्या माध्यमातून वृद्धींगत करणे असे अनुषंगिक उपक्रम या केंद्राच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत.
उच्च शिक्षणातील विविध विषयांमध्ये भारतीय भाषांमध्ये अनुवाद, भारतीय भाषेतील पुस्तक लेखनाला चालना देण्यासाठी नोडल विद्यापीठे निश्चित करण्यात आली असून सिंधी भाषेसाठी मुंबई विद्यापीठ नोडल विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक लेखन आणि अनुवादाला प्रोत्साहन दिले जाणार असून त्याचबरोबर इतर भाषेतील शैक्षणिक साहित्य प्रादेशिक भाषेत भाषांतरित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध भारतीय भाषांचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी व बृहद समाज यांना भाषेशी जोडण्याचे कार्य या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार असल्याचेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.