मुंबई :
मुंबई महानगर पालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार चव्हाट्यावर येत असून पालिकेतील अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. मुलुंड पुर्व, गवाणपाडा या ठिकाणी नाले, गटारे भरुन वाहतात, परिसरात दुर्गंधी पसरली आहे तरी पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे तर दुसरीकडे राजे संभाजी मैदानाची दुरावस्था केली जात असतानाही गार्डन विभाग अस्तित्वात आहे की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पालिकेचे अधिकारी इतके निगरगठ्ठ झाले आहेत की त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे काहीच पडले नाही. एखाद्या समस्यांबाबत वृत्त पत्रात बातम्या प्रकाशीत होऊन ही पालिकेच्या अधिका-यांवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. मुलुंड पुर्व येथील गवाणपाडा या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नाल्यातून दुर्गधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. याबाबत वारंवार तक्रार केल्यावर पालिकेने या ठिकाणी खड्डा करुन पत्रे ठोकुन दिले आहेत. मात्र नाल्यातून येणा-या पाण्यातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांचा प्रादुभाव वाढत आहे जे आरोग्याला अपायकारक आहे. या रस्त्यावर तरुण उत्कर्ष विद्यामंदिर, मुंबई पब्लिक स्कूल आणि होली ऐंजल्स या तीन शाळांचे विद्यार्थी व पालक यांची दिवसभर ये-जा सुरु असते शिवाय मोठ्या स्कूल बसची देखील रहदारी आहे. त्याच बरोबर रस्त्याच्या दुतर्फा बाजुला वाहने पार्किंग केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो त्यामुळे पादचा-यांचा त्याचाही त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता महिला, जेष्ठ नागरिक यांना रहदारीसाठी अपघात क्षेत्र बनत चालला आहे. मुलुंड पुर्व मध्ये अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर असून त्यांच्यावर पांढ-या पट्ट्या नसल्याने अंधारात गाड्या त्यावर आदळून अनेक ठिकाणी अपघात होतात. शिवाय मुलुंड मध्ये असलेल्या छत्रपती संभाजी राजे मैदानाची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणावर खेळाच्या धावपट्या तयार करण्यात आल्या आहेत. याकडे ही पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एकादी मोठी दुर्घटना होण्याची पालिका अधिकारी, गार्डन विभाग वाट पाहत आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.