मुंबई :
शहरातील पदपथ, रस्ते अनधिकृतरित्या फेरीवाल्यांनी बळकावले असून सर्वसामान्य नागरिकांना चालणे अवघड होऊन गेले आहे. आता तर पदपथ बरोबर रस्त्यांवरही फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने मुलुंडकर हैराण झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करुनही पालिकेकडून दिखाऊपणाची कारवाई केली जाते. हा सर्व उद्योग पालिका व फेरीवाल्यांच्या संगनमताने होत असल्याची चर्चा मुलुंडमध्ये आहे.
मुलुंड पुर्व रेल्वे स्थानकानजीक मोठ्या प्रमाणावर बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ व रस्त्यांवर आपला कब्जा करुन ठेवला आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ कामावरुन येणा-या नागरिकांना रस्ता व पदपथावरुन चालणे अवघड होऊन जाते. याबाबत फेरीवाल्यांना एखाद्या नागरिकांनी जाब विचारला तर अंगावर धाऊन जाणे, शिविगाळ करणे या सारख्या घटना आता नित्यनियमाच्या झाल्या आहेत. रेल्वे स्थानकाजवळ पदपथावर बसेलेल्या फेरवाल्यांनी रस्त्यावर येऊन धंदा करु नये म्हणुन पालिकेतर्फे लोखंडी रेलिंग लावण्यात आले होते. मात्र काही दिवसातच फेरीवाल्यांनी एकेक करीत सर्व रेलिंग तोडून टाकल्या व पुर्वीप्रमाणे ते रस्त्यावरही येऊन बस्तान मांडू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. फेरीवाल्यांमुळे सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. मुलुंड पुर्वेला असलेल्या साईनाथ चौकात तर फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानदारही आपल्या दुकानातील सामान दुकाना बाहेर काढून लावत असतात. त्यांच्यावर पालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. फेरीवाल्यांनी तर मनमानीपणाने पदपथ व रस्त्यावर कब्जा केला असून रोगराईला आमंत्रण देणारे पदार्थ उघड्यावर तयार करुन त्याची विक्री केली जाते.
शहरात फेरीवाल्यांनी विभागानुसार वॉट्सअँप ग्रुप तयार केलेले असुन कारवाईसाठी आलेल्या गाड्या कोणत्या ठिकाणी असून काय कारवाई करीत आहे, याची सर्विस्तर माहिती ग्रुपवर टाकली जाते. शिवाय फेरीवाल्यांचा एक मोरक्या ज्याचे संबंध पालिका अधिका-याबरोबर असतात कोणत्या वेळेला गाडी कारवाईसाठी येणार आहे, दुस-या वार्डची गाडी कधी येणार आहे याची सविस्तर माहिती पालिकेचेच अधिकारी या मोरक्याला देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या दिवशी दुस-या वार्डची गाडी येणार असेल त्या दिवशी फेरीवाले आपला धंदा बंद करुन ठेवतात. त्यामुळे पालिकेचे अधिकारी दिखाऊपणाची कारवाई करीत असल्याची चर्चा मुलुंड मध्ये आहे. पालिका अधिकारी व फेरीवाल्यांचे लागेबांधे असल्याने दुकानाबाहेर बेकायदेशीर सामान ठेऊन पदपथ अडवणा-या दुकानांवर तसेच फेरीवाल्यांवर कायमस्वरुपी कारवाई कधी करणार, असा प्रश्न मुलुंडकर विचारत आहेत.