मुंबई :
१९ डिसेंबरः १६ ते १९ डिसेंबर २०२४ दरम्यान गोविंद गुरू जनजातिय विद्यापीठ बाँसवाडा राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या खो-खो संघाने अजिंक्यपद पटकावून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा या राज्यातील ७२ विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठ मुलींच्या खो-खो संघाने उपांत्यपूर्व फेरीमध्ये (क्वार्टर फायनल) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा २४ गुणांनी पराभव करत मुंबई विद्यापीठ चमू अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. तर साखळी स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांचा ८ गुणांनी पराभव केला, तसेच व्ही. एन. यू. डी. विद्यापीठ गुजरातचा १ डाव ३ गुणांनी पराभव केला तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संघाचा २ गुणांनी पराभव करून या स्पर्धेत अजिंक्य पद मिळवले.
मुंबई विद्यापीठाच्या या संघामध्ये गीतांजली नरसाळे, साक्षी तोरणे, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी, अपर्णा खंडागळे, सानवी तळवडेकर, दिव्या गायकवाड, रोशनी जूनगरे, श्वेता जाधव, पायल पवार, श्रिया नाईक, श्रेया सनगरे, साक्षी डफाळे, काजल शेख, कल्याणी कंक या खेळाडूंचा सहभाग होता. संघाला प्रशिक्षक म्हणून पंकज चव्हांडे आणि संघ व्यवस्थापक म्हणून रोहिणी डोंबे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी या चमूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.