शहर

महाराष्ट्राच्या करीना आणि केया यांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित

नवी दिल्ली : 

महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी , राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर व महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा 14 राज्यांमधील10 मुली व 7 मुले असे एकूण 17 मुलांना गौरविण्यात आले. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून 2022 पासून 26 डिसेंबर या दिवशी ‘वीर बाल दिवस’ म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन व शौर्याचे स्मरण करण्यात येते. शिख धर्मातील दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय 9) आणि बाबा फतेहसिंग (वय 5) यांच्या अव्दितीय शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाएवजी वीर बाल दिवस म्हणजेच 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतात.

करीना थापाचे शौर्य : 70 कुटुंबांचे प्राण वाचवले

अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने 70 कुटुंबांचे प्राण वाचवले. बी-विंगमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याचे दिसताच, करिनाने प्रसंगावधान दाखवत कुलूप तोडून आत प्रवेश केला. सिलेंडरजवळील आग आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची भीती टळली. तिच्या शौर्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केया हटकर : साहित्य आणि समाजकार्याची ओळख

मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. तिच्या ‘डान्सिंग ऑन माय व्हिल्स’ आणि ‘आय एम पॉसीबल’ ही दोन्ही पुस्तके जागतिक स्तरावर नावाजले गेले आहेत. 13 वर्षांच्या केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य 26 देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. केयाला 10 महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या आजाराने ग्रसित आहे, ज्यामुळे ती कायमस्वरूपी व्हीलचेअरवर असते. मात्र, तिने हा आजार तिच्या यशाच्या मार्गातील अडथळा होऊ दिला नाही. तिच्या साहित्य व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते आणि मान्यवर व्यक्तींसह सुमारे 3500 मुले सहभागी झाली. मुलांनी विविध भारतीय संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मार्च पास्टमध्ये भाग घेतला.

यासोबतच, युवा मनांना गुंतवून ठेवण्यासाठी, या दिवसाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जातील. MyGov आणि MyBharat पोर्टलच्या माध्यमातून परस्पर संवादात्मक प्रश्नमंजुषेसह ऑनलाईन स्पर्धांची मालिका आयोजित केल्या जातील. शाळा, बालसंगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन, सर्जनशील लेखन, भित्तीचित्रे तयार करणे यासारखे मनोरंजक उपक्रम हाती घेतले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *