मुंबई :
नवीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी मधील बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याची उजळणी घोषणा केली असून हा निर्णय खरोखरच चांगला आहे. पण नेहमीचा अनुभव पाहता त्याचे रूपांतर हस्तक्षेपात होऊ नये, या घोषणेची काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे केली आहे.
सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ही बाब चांगली असून खरोखरच अभिनंदनीय आहे. प्रभार स्वीकारल्यावर ॲक्शन मोडवर आल्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण हा त्यांचा निर्णय उजळणी घोषणा असून एप्रिल २४ मध्ये बदल्या ॲपनुसार ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला होता. तसे कामही एका कंपनीला देण्यात आले आहे. पण ॲपचे काम अपूर्ण असल्याने राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे व हस्तक्षेपामुळे विधानसभा निवडणुक आचार संहितेपूर्वी साधारण १५० पेक्षा जास्त बदल्या प्रतिनियुक्तीवर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार साधारण १२० बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यामध्ये गरजू तसेच पती- पत्नी एकत्रीकरण व दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या अजून काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करून त्यांना निदान या पुढे न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही असेही बरगे यांनी म्हंटले आहे.
एसटी मधील बदल्या, बढत्यांमध्ये पारदर्शकता आणण्याकरता ऑनलाईन बदल्या आणि बढत्या करण्याचा निर्णय प्रशासनाने या पूर्वीच घेतला असून तो खरोखरच चांगला आहे.त्याची उजळणी घोषणा नवीन परिवहन मंत्र्यांनी केली असून राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली बदल्या होणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे एसटी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असून संपूर्ण बदल्या ऑनलाईन करणार असल्याचे देखील सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच या निर्णयाची याच आठवड्यात अंमलबजावणी होईल, असे देखील म्हटले आहे. या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हरकत नाही. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत म्हणजे गरजू कर्मचाऱ्याना न्याय मिळेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.