मुंबई :
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाची विद्यार्थ्यांना तयारी करणे सोपे व्हावे यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) टप्प्याटप्याने विविध अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. एमबीए/ एमएमएस, एमएड, एमपीएड आणि एमसीए या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २७ डिसेंबर रोजी सकाळपासून सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थी हित लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर टप्प्याटप्याने सर्व अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. एमबीए/ एमएमएस, एमएड, एमपीएड आणि एमसीए या अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी २५ डिसेंबर रोजी सुरू केल्यानंतर आता विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला २७ डिसेंबर रोजी सकाळपासून सुरूवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी एक महिन्यांची मुदत दिली असून, २७ जानेवारीपर्यंतच विद्यार्थ्यांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. संभाव्य तारखेनुसार विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा ही २० आणि २१ मार्च २०२५ रोजी होणार आहे. अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असून टप्प्याटप्याने सर्व अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये विधी तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी १९ हजार ३४१ जागांसाठी राज्यभरातून ५२ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरले होते. त्यामुळे महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तर ५९३ जागा रिक्त राहिल्या आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे, तर उर्वरित अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी प्रक्रिया त्यानंतर सुरू होण्याची शक्यता असल्याची मााहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.