पनवेल :
प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कामाचा धडाका सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी ठाण्यातील खोपट डेपोला अचानक भेट दिली होती. गुरुवारी (२६ डिसेंबर) त्यांनी पनवेल आणि खोपोली एसटी डेपोंना भेट देत तेथील बस सेवा, कर्मचाऱ्यांच्या सुविधा, प्रवाशांना सेवा आणि सुविधा तसेच व्यवस्थापनाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे पनवेल एसटी डेपो हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी थेट पनवेल डेपोत पाऊल ठेवले. त्यानंतर प्रवाशांशी संवाद साधला, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून सूचनाही केल्या. मंत्र्यांच्या अचानक भेटीमुळे अधिकारी – कर्मचाऱ्यांची थोडी तारांबळ उडाली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी स्वच्छता गृह, सर्वसामान्य प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि महिला विश्रांती कक्षाचा दर्जा उंचावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
कारभार सुधारा अन्यथा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल डेपोचा कारभार पाहून नाराजी व्यक्त केली. प्रवाशांना दर्जेदार सुविधा द्या, तिकीट काऊंटरची संख्या वाढवा अशी सूचना करत आगारातील व्यवस्थापनाबद्दल डेपोप्रमुखांना सुनावले. डेपोतील धुळीचे साम्राज्य, प्रवाशांची होणारी गैरसोय पाहून पहिवहन मंत्री नाराज झाले होते.
विशेष म्हणजे यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेलहून खोपोलीचा प्रवास एसटीने केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रवाशांच्या समस्या त्वरित सोडवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या समस्यांविषयी जाणून घेतले. यावेळी खोपोलीतील शिळफाटा एसटी स्थानकासाठी ५ कोटी निधी मंजूर करण्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पनवेल आणि खोपोली डेपोंना भेट दिली तेव्हा प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, कार्यकारी अभियंता (मुंबई) मिनल मोरे, विभागीय नियंत्रक (रायगड) दीपक घोडे, यंत्र अभियंता (रायगड) संदीप शिंदे, विभागीय वाहतtक अधिकारी प्रशांत खरे, कर्जत डेपो व्यवस्थापक देवनंद मोरे आदी उपस्थित होते.
प्रवाशांच्या सुखासाठी वचनबद्ध असून, अचानक भेटी देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रवाशांना चांगली सेवा पुरवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य