बदलापूर :
नववर्षाच्या पूर्व संध्येला म्हणजेच थर्टी फर्स्टला मोठ्या प्रमाणात विना परवाना ओली पार्टी केली जाते. नववर्ष स्वागताला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कुळगाव पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल, धाबे, फार्महाउस, बार अँड रेस्टॉरंट मालक – चालक यांना नववर्षाच्या शुभेच्छासह थर्टी फस्टच्या अनुषंगाने पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत
काय आहेत सूचना
१. कोणीही विनापरवाना दारू विक्री करणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री अथवा वापर करणार नाही.
२. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार DJ अथवा डॉल्बीचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. स्विमिंग पूल च्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून परवानग्या घेण्यात याव्यात. परवानित स्विमिंग पूल असेल तरच त्याचा वापर करावा व स्विमिंग पूल करिता आवश्यक तेवढ्या सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी
४. विद्युत सप्लाय व स्विमिंग पूल च्या अनुषंगाने विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे जेणेकरून कोणतीही जीवित हानी होणार नाही.
५. शासनाकडून निर्गमित केलेल्या विविध आस्थापनांच्या चालू व बंद वेळेबाबतच्या आदेशाचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घ्यावी.
६. अठरा वर्षाखालील मुला मुलींना त्यांचे पालक सोबत असतील तरच प्रवेश द्यावा अन्यथा प्रवेश देण्यात येऊ नये
७. आस्थापनामध्ये जे लोक येणार आहेत त्यांचे आवश्यक ते ओळखपत्रे घेऊनच त्यांना प्रवेश द्यावा
८.तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी नेहमी सतर्क रहावे व कसलाही गैरप्रकार आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावी.
याबाबत लेखी नोटीस अदा करण्यात आलेल्या असून देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कुळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी कळविले आहे.