कल्याण :
कल्याणमध्ये शेजाऱ्याने शेजारच्या कुटुंबीयावर केला कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करत रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात घडला आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून यामध्ये तीन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. याप्रकरणी आरोपी चेतन मांदळे याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.
शेजाऱ्यांच्या बडबडीमुळे झोप येत नाही या कारणावरून शेजारच्या तरुणाने त्याच्याशी वाद घातला. इतकेच नव्हे तर संतापलेल्या तरुणाने शेजाऱ्याचे घर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुऱ्हाडीने शेजारील कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. महात्मा फुले पोलिसांनी यामधील हल्लेखोर आरोपी चेतन मांडळे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी चेतन हा खाजगी बँकेत नोकरी करतो. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.