मुंबई :
अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, कृषी शिक्षण आणि बी. प्लॅनिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रिया नोंदणीला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आजपासून सुरुवात झाली. १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी)चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेपैकी एमएचटी सीईटी ही महत्त्वाची परीक्षा असते.
विद्यार्थी हित लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार मार्चपासून परीक्षा सुरू होणार आहेत. १६ मार्च ते २७ एप्रिल २०२५ या ४५ दिवसांच्या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या सर्वच परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपासून एम.एड., एम.पी.एड., एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर २७ डिसेंबरपासून विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया नोंदणीला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ आता अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, कृषी शिक्षण आणि बी. प्लॅनिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला ३० डिसेंबरपासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारी २०२५पर्यंत अर्ज करत येणार आहे. त्यानंतर विलंब शुल्क भरून १६ ते २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
गतवर्षी सात लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
दरम्यान, एमएचटी सीईटी या परीक्षेला दरवर्षी साधारणपणे सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणी करतात. सीईटी कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेला ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. संभाव्य वेळापत्रकानुसार एमएचटी सीईटी (पीसीबी) गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिल २०२५ तर एमएचटी सीईटी (पीसीएम) गटाची परीक्षा १४ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत होण्याची शक्यता आहे.