शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

४३९ परीक्षा केंद्रावर १ लाख ३८ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पदवी स्तरावरील बीकॉम सत्र ६ ची परीक्षा १८ मार्च, बीएस्सी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च, बीए सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. तर बीएस्सी आयटी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्ग स्वयंअर्थसहाय्यित विषयांची परीक्षा १८ मार्च, बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च २०२५ रोजी घेण्याचे विद्यापीठामार्फत नियोजित करण्यात आले आहे.

१ लाख ३८ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

विद्याशाखानिहाय मानव्य विज्ञान शाखेसाठी १४७२३, वाणिज्य शाखेसाठी ७४४८३, विज्ञान २७१३४, तंत्रज्ञान १३००४, विधी ८७२५ असे एकूण १ लाख ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये ७५३४६ मुले, ६२७१७ आणि इतर ६ एवढ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यातील एकूण ४३९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

डिजिटल प्रणालीतून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकाची माहिती उपलब्ध

विशेष म्हणजे परीक्षा विभागाने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल युनिव्ह्रर्सिटी पोर्टल (DU portal ) यावर ३ महिन्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या आसन क्रमांकासह परीक्षा केंद्र आणि परिक्षेची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना https://mum.digitaluniversity.ac/ à Know Your Exam Venue नुसार विद्यार्थ्यांना ही तंत्रस्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उन्हाळी सत्र २०२५ च्या परीक्षांचे सुक्ष्म नियोजन केले असल्याचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि अनुषंगिक तपशील याबाबतचे तात्पुरते प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व महाविद्यालयांनी या प्रवेशपत्रातील तपशील तपासून त्यातील काही दुरुस्ती असल्यास तात्काळ विद्यापीठाकडे संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *