मुंबई :
मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय ते देखील पालिका रुग्णालयात. याला सर्वस्वी मुंबई महानगर पालिका प्रशासन जबाबदार असून गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात गेल्या पाच वर्षांपासून कर्मचा-यांची कमतरता असूनही पालिका कर्मचा-यांची पदे भरण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळेच याठिकाणी सफाई कर्मचा-यामार्फत रुग्णांचे ईसीजी काढण्यात येत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोवंडी येथील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात सफाई कर्मचारी रुग्णांचे ईसीजी काढत असल्याची माहिती समोर येताच याबाबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिका-यांशी संपर्क साधला असता, रुग्णालयात गेल्या पाच वर्षांपासून ईसीजी तंत्रज्ञ नसून इतर ही काही विभागात कर्मचा-यांची कमतरता आहे. रुग्णालयात काम करणा-या सफाई कर्मचा-याला ईसीजी बाबतचे सर्व प्रशिक्षण दिल्यावर त्याच्या मार्फत ईसीजी काढले जात असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी दिली. मात्र या प्रकारानंतर एका फिजिशियन असिस्टंट मार्फत ईसीटी काढले जात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ईशान्य मुंबईतील सर्वच पालिका रुग्णालयात कर्मचा-यांची कमतरता असून याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी वारंवार आवाज उठवला आहे. इतकेच नव्हे तर संसदेत रुग्णालयांच्या दयनीय अवस्थे बाबत प्रश्न मांडला होता. ईशान्य मुंबईतील सर्वच रुग्णालयात कर्मचा-यांची कमतरता असून त्याचा ताण इतर कर्मचा-यांवर पडत आहे. भांडुप येथील पालिकेच्या अनागोंधी कारभारामुळे एका महिलेचा आणि तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. ते रुग्णालय देखील दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. याबाबत खासदार संजय दिना पाटील यांनी पालिका उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांनाही जाब विचारला होता. पालिकेच्या हलगर्जीपणाचा फटका गरीब रुग्णांना बसत असून अशा रुग्णांना उपचारासाठी राजावाडी किंवा सायन रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्काळ कर्मचा-यांची रिक्त पदे भरावित. रुग्णांच्या जीवाशी खेळू नये. ईशान्य मुंबईतील सर्व रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात. अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.